आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा – महासंवाद

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा – महासंवाद
- Advertisement -

मुंबई,दि.२१ : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी २० व २१ रोजी तामिळनाडू राज्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन, तेथे राबविण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक योजनांचा अभ्यास केला. या दौऱ्याचा मुख्य उद्देश तामिळनाडूच्या आरोग्य व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन, महाराष्ट्रात त्याचा उपयोग कसा करता येईल, याचा अभ्यास करणे हा होता.

तामिळनाडू औषध व वैद्यकीय साहित्य खरेदी प्राधिकरणास भेट

या दौऱ्यात “तामिळनाडू औषध व वैद्यकीय साहित्य खरेदी प्राधिकरणास” भेट देण्यात आली. या ठिकाणी राज्यमंत्री साकोरे- बोर्डीकर यांनी औषध व वैद्यकीय साहित्य खरेदी व वितरण प्रक्रिया समजून घेतली. ही संस्था आरोग्य क्षेत्रातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी कशा पद्धतीने कार्यरत आहे, याची माहिती त्यांनी घेतली.

माता व बाल आरोग्य सेवा निरीक्षण

तामिळनाडूमध्ये गरोदर माता आणि बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा जाणून घेण्यासाठी राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित संस्थांना भेट दिली. या भेटीदरम्यान, गरोदर माता आणि नवजात बालकांसाठी तामिळनाडू सरकार कोणत्या योजना राबवते, त्यांची प्रभावी अंमलबजावणी कशी केली जाते, याचा अभ्यास केला.

आरोग्य मंत्री मां सुब्रमणियन यांच्यासोबत सखोल चर्चा

तामिळनाडू राज्याचे आरोग्य मंत्री मां सुब्रमणियन (Ma Subramanian) यांची भेट घेऊन राज्यातील आरोग्य विषयक विविध कार्यक्रम व त्यांची अंमलबजावणी यासंबंधी सखोल चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्र व तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे कशा राबवता येतील याविषयी महत्त्वपूर्ण मुद्दे चर्चिले गेले.

या दौऱ्यादरम्यान तामिळनाडूमधील महत्त्वाच्या आरोग्य सेवा यामध्ये १०८ वॉर रूम – आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत करण्यासाठी असलेल्या नियंत्रण कक्षाचा आढावा,102 सेवा – माता व बाल आरोग्यासाठी राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचा अभ्यास,नॉन कम्युनिकेबल आजारांवरील सेवा – मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यासारख्या दीर्घकालीन आजारांसाठी तामिळनाडू सरकार राबवत असलेल्या सेवांचे निरीक्षण केले.

या अभ्यास दौऱ्याच्या वेळी  मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, श्री.सिंग, डॉ. अंबाडेकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी  ही उपस्थित होते. या अभ्यास दौऱ्याचा उपयोग महाराष्ट्र राज्यातील आरोग्य व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

०००००००

- Advertisement -