Home ताज्या बातम्या आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. १०: संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रविंद्र धंगेकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे,  प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, साधुसंतांची विचारधारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पंढरपूर वारीच्या निमित्ताने हा विचार सर्वत्र पोहोचतो. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. वारीदरम्यान महिलांना २३ ते २४ दिवस चालावे लागते. या कालावधीत त्यांना एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आरोग्यवारी अभियान सुरू करण्यात आले आहे.

वारी दरम्यान महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. महिला वारकऱ्यांच्या हस्ते १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार धंगेकर म्हणाले की, वारीच्या निमित्ताने सर्व धर्मातील एकात्मता दिसून येते. वारीसाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या सुविधा केल्या आहेत. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य असून वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात आरोग्यवारी अभियानाची माहिती दिली. वारी सोहळ्यादरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

०००