मुंबई, दि. ३ : सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत व बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंग प्रणालीची नजर राहणार असून, सेवांमध्ये कोणताही गैरप्रकार,अनियमितता, गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधित संस्थांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.
मुंबईत आरोग्यसेवा आयुक्तालयात सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बाह्यस्रोतांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेण्यात आला. यांत्रिक धुलाई, प्रयोगशाळा (एचएलएल) सेवा,रक्त तपासणी, एक्स-रे, टेलिरॅडिओलॉजी, सिटी स्कॅन, एमआरआय, उपकरणांची देखभाल-दुरुस्ती, डायलिसिस, आहार पुरवठा, स्वच्छता तांत्रिक सहाय्य, आदी सेवांचा यावेळी आढावा घेण्यात आला.
नागरिकांना दर्जेदार सेवा मिळणे ही विभागाची प्राथमिकता आहे. त्यामुळे बाह्यस्रोतांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक सेवेचे नियमित परीक्षण आणि मूल्यांकन करावे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सेवांची नियमित तपासणी करून गुणवत्तेचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील सेवांचे प्रमाणीकरण आणि गुणवत्तावाढ करण्यासाठी रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत विशेष वैद्यकीय सेवांची उपलब्धता, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधांचा पुरवठा, प्रयोगशाळा सेवा, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा, प्रसूती व शस्त्रक्रियांची संख्या, स्वच्छता, उपलब्ध सुविधांचा वापर आणि रुग्णांचे अभिप्राय आदी निकषांवर आरोग्य संस्थांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
राज्यातील सर्व सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून सकस व आरोग्यदायी आहार पुरवठा करण्याच्या स्थानिक आमदारांच्या सहभागाने आरोग्य समितीच्या बैठका घेऊन त्यातील कार्यवाहीची अंमलबजावणी आणि त्याबाबतचा अहवाल तयार करावा, नोव्हेंबर महिन्यात जनआरोग्य समितीची राज्यस्तरीय बैठक होणार असून, त्यापूर्वी राज्यातील सर्व जन आरोग्य समित्या प्रभावी पने कार्यान्वित असाव्यात, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांची स्टार रेटिंग प्रणाली या तीन महत्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्यातील आरोग्यविषयक माहितीचे केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी प्रभावी वापर करावा आणि नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव इ. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, शहरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, रुग्णालय-आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाईत तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपसंचालक आणि वैद्यकीय अधीक्षक सहभागी झाले होते.
0000
















WhatsApp