Home ताज्या बातम्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

0
आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

पुणे दि १८: आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून उमेदवारांना संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याच दिवशी आदेशही दिले जात आहेत.

ही भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन प्रक्रिया संपूर्ण पारदर्शी आणि सुरळीत पडण्याविषयी निर्देश दिले होते. आरोग्य विभागातील गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील १० हजार ९४९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस संस्थेची निवड करण्यात आली होती.

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी टिसीएसकडून सीसीटिव्ही रेकॉर्डिंग, बायोमेट्रीक्स हजेरी, फिंगर प्रिंट व आयरीस तपासणी सुविधा वापरण्यात आल्या आहेत . तसेच ईलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया लि. (ईसीआयएल) यांच्याकडून परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेच्या कालाधीत ५-जी मोबाईल जॅमर्स ची व्यवस्थाही करण्यात आलेली होती. परीक्षेत होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या होत्या.

परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी विभागनिहाय राज्यभर सुरू असून पुणे विभागातील आरोग्य भवन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, प्रबोधन हॉल पुणे येथे या विभागातील समुपदेशन व नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात येत आहेत. यामध्ये उमेदवारांना विभागाच्यावतीने संपूर्ण सहकार्य करण्यात आले. उमेदवारांना असणाऱ्या विविध समस्यांचे निवारण करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया २ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्व पदांची भरती प्रक्रिया अगदी पारदर्शी आणि सुरळीतरित्या पार पडल्याबद्दल निवड झालेल्या उमेदवारांनी प्रा. डॉ. सावंत यांचे आणि आरोग्य विभागाचे आभार मानले. काही उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी उमेदवारांनी भरती प्रक्रिये बाबत समाधान व्यक्त केले.

यावेळी आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी भरती प्रक्रियेची माहिती दिली.

वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या जागा भरणे आरोग्यमंत्री प्रा.डॉ. सावंत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले आहे.
००००