मुंबई : कुठल्याही अभ्यासाअभावी सचिन सावंत यांचं नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे, असा टोला भाजप नेते आशिष शेलार यांनी सचिन सावंतांना लगावला आहे.
मजुरांचे 85 टक्के रेल्वेभाडं केंद्र सरकार भरतं, हा भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढलं आहे. सचिन सावंत हे उपेक्षित जरूर आहेत, पण त्यांनी आपल्या प्रवक्तेपदासाठी अपेक्षित अभ्यास करूनच बोलावं, असं म्हणत शेलारांनी सावंतांवर निशाणा साधला आहे.
एक रेल्वे चालविण्यासाठी रेल्वेला सुमारे 30 ते 50 लाख रूपयांचा अंतरानुसार खर्च येतो. या खर्चाचे गणित एसी 1, एसी 2, एसी 3, स्लीपर या भागांमध्ये विभागले जाते. स्लीपरचे दर हे अनुदानानुसारच असतात. साधारणत: एका तिकिटासाठी येतो तो खर्च आणि आता राज्य सरकारकडून एका तिकिटासाठी आकारण्यात येत असलेला दर यातील प्रमाण हे 85 टक्के आणि 15 टक्के असेच आहे, असं शेलार यांनी सांगितलंय.
ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीचा दाखला देण्यात येत आहे, त्यात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हेच सांगितलं की, तिकिटाचे दर हे राज्य सरकारकडून घेण्यात येत आहेत. पण, एक रेल्वे चालविण्याचा एकूण खर्च किती, अशा बाबींवर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद होत नाही. कारण तेथे उपस्थित सर्वांना हा हिशेब माहिती आहे, असं शेलारांनी सांगितलंय.