आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा अन् गुणवत्तापूर्ण शिक्षण – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आश्रमशाळांमध्ये दर्जेदार सुविधा अन् गुणवत्तापूर्ण शिक्षण – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके
- Advertisement -


नाशिक, दि. १५ जून (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती केल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आश्रमशाळेबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.
चणकापूर (ता. कळवण) येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त डिगंबर चव्हाण, दिनकर पावरा, कळवणच्या प्रकल्पाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, अधीक्षक अभियंता प्रदीप दळवी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.

मंत्री डॉ. वुईके म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासह पुस्तकांचे वितरण करण्यात आले. आश्रमशाळेत नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना पाच जुलैपर्यंत गणवेश देण्यात येईल. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. आश्रमशाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी वार्षिक नियोजन कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे आयुक्त श्रीमती बनसोड यांनी सांगितले.

प्रकल्प अधिकारी डॉ. संखे यांनी प्रास्ताविकात आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यानंतर मंत्री डॉ. वुईके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधत त्यांच्यासमवेत भोजनाचा आनंद घेतला. डिजिटल इन्व्हायर्मेन्ट स्टुडिओचे अनावरण आदिवासी विकास विभागामार्फत अपर आयुक्त कार्यालयात डिजिटल इन्व्हायर्मेन्ट स्टुडिओ उभारण्यात आला आहे. या स्टुडिओचे अनावरण मंत्री डॉ. वुईके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त श्रीमती बनसोड, नाशिकच्या प्रकल्पाधिकारी अर्पिता ठुबे, अपर आयुक्त श्री. चव्हाण, श्री. पावरा, उपायुक्त संतोष ठुबे आदी उपस्थित होते. स्टुडिओच्या माध्यमातून मंत्री डॉ. वुईके यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

०००००



Source link

- Advertisement -