Home शहरे मुंबई आषाढीसाठी झाली लाल परी सज्ज; ग्रुप बुकिंगला प्रतिसाद नाही

आषाढीसाठी झाली लाल परी सज्ज; ग्रुप बुकिंगला प्रतिसाद नाही

ठाणे : आषाढी एकादशीला भक्तिभावाने श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पायी निघाले आहेत. तर, १२ जुलैच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने ८ ते १२ जुलैदरम्यान विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार, त्या पाच दिवसांत आतापर्यंत ९६ बस जाण्यासाठी, तर परतीच्या प्रवासासाठी ५७ एसटीचे बुकिंग फुल्ल झाले आहे. तसेच पंढरपूरला जाण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी पाहून आणखी जादा बस सोडल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फेराज्याच्या विविध भागांतून ३७२४ बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनंतर परतीच्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन स्त्रिया व आबालवृद्धांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एकूण जादा बसपैकी १० टक्के बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ठाणे विभागामार्फत गतवर्षी सरासरी ६५ बस सोडल्या होत्या. पण, यंदा सरासरी ८३ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. साधारणत: ठाणे विभागातून दिवसभरात ३२ बस बुकिंगसाठी असणार आहे. तसेच नियोजित केलेल्या ८३ बस ठाणे विभागातील ठाणे (१), ठाणे (२), भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी आणि वाडा अशा आठ डेपोंमधून सोडण्यात येणार आहेत. त्यातच, पंढरपूरसाठी ८ जुलै रोजी २० गाड्यांचे बुकिंग झाले आहे.
९ जुलैला १९, १० जुलै २२, ११ जुलैला १६ आणि १२ जुलै १९ एसटी बसगाड्यांचे बुकिंग केले आहे. तर, परतीचा प्रवास हा १३ ते १५ जुलैचा असल्याने त्या तिन्ही दिवसांमध्ये प्रत्येकी १९ अशा ५७ गाड्या फुल्ल झाल्या आहेत. आॅनलाइन तिकीट बुकिंगमध्ये एक बस भरल्यावर दुसऱ्या बस बुकिंग सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वैयक्तिक बुकिंगद्वारे आरक्षण
ग्रुप बुकिंगची व्यवस्थाही यंदा ठेवली होती. त्यानुसार, ग्रुपचे आवाहन करूनही आतापर्यंत कोणीही ग्रुपद्वारे पंढरपूरला जाण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे यंदा ग्रुप बुकिंगपेक्षा वैयक्तिक बुकिंगद्वारे आसने आरक्षित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.