आषाढी वारी २०२६: चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

आषाढी वारी २०२६: चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज
- Advertisement -


पंढरपूर, दि. १६: आषाढी शुद्ध एकादशी २५ जुलै रोजी होत असून या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीपात्रात वारकरी-भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक नियोजन केले आहे. नदीपात्रात गस्त व बचावकार्यासाठी NDRF सह राज्यभरातील १३ स्वयंसेवी संस्थांचे एकूण १८० आपदा मित्रांचे पथक तैनात करण्यात येत आहे.

या बचाव पथकामध्ये NDRF चे ३० जवान, ठाणे आपदा मित्रचे २ स्वयंसेवक, वाशीम जिल्हा आपदा मित्रचे १० स्वयंसेवक, आपत्ती संघ पिंपरी-चिंचवडचे १० स्वयंसेवक, वन्यजीव रेस्क्यू पुणेचे १० स्वयंसेवक, मुळशी आपत्ती समिती पुणेचे १० स्वयंसेवक, हेल्पिंग हॅण्ड शिरोळ (कोल्हापूर) चे २० स्वयंसेवक, सारथी फाउंडेशन सोलापूरचे १० स्वयंसेवक, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरी (जि. सोलापूर) चे १० स्वयंसेवक यांचा समावेश आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील कोळी समाजातील होडीवाल्यांचे ३० जणांचे आदिवासी रेस्क्यू पथक, सोलापूर येथील रेड फेरी ग्रुपच्या १५ महिला बचाव स्वयंसेविका, महाराष्ट्र रेस्क्यू फाउंडेशन पंढरपूरचे ५ स्वयंसेवक आणि सोलापूर जिल्ह्यातील २० पोलीस पाटील यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

सर्व आपदा मित्र स्वयंसेवक असल्याने १० ते १५ टक्के संभाव्य ड्रॉपआऊट गृहीत धरूनही पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच बचावकार्यातील बोटी व इतर यंत्रसामग्रीच्या तांत्रिक देखभाल-दुरुस्तीसाठी २ अनुभवी मेकॅनिकही संपूर्ण वारी कालावधीसाठी पंढरपूर येथे नियुक्त करण्यात आले आहेत.

आषाढी यात्रा कालावधीत लाखो भाविक चंद्रभागा नदीत स्नानासाठी उतरत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी नदीपात्रात बोटीद्वारे २४ तास गस्त ठेवण्यात येणार आहे. सर्व बचाव पथकांकडे लाईफ जॅकेट, लाईफ बॉय व इतर अत्याधुनिक बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नदीकाठावर निरीक्षण मनोरे उभारून तेथूनही सतत लक्ष ठेवले जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व पथकांना प्रशिक्षण व सूचना देण्यात आल्या असून नियंत्रण कक्षाशी समन्वय ठेवून काम करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिले आहेत.

००००



Source link

- Advertisement -