Home बातम्या आंतरराष्ट्रीय ‘आसियान’ परिषदेदरम्यान बॅँकॉकमध्ये स्फोट

‘आसियान’ परिषदेदरम्यान बॅँकॉकमध्ये स्फोट

0

बॅँकॉक : आग्नेश आशियाई देशांचे संघटन अर्थात ‘आसियान’ची शिखर परिषद सुरू असतानाच शहरात शुक्रवारी सहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. त्यात चार जण जखमी झाले असून, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, भारतासह अनेक महत्त्वाच्या देशातील परराष्ट्रमंत्री परिषदेत उपस्थित असून, स्फोटांचा नियोजित कार्यक्रमावर काहीही परिणाम न झाल्याचे थायलंड सरकारने स्पष्ट केले आहे. ‘आसियान’ परिषदेत भारतातर्फे एस. जयशंकर, अमेरिकेतर्फे माइक पॉम्पियो आदी उपस्थित आहेत. 

‘अटींशिवाय दूतावासाची मदत द्या’ 

नवी दिल्ली : कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही अटींशिवाय दूतावासाची मदत (कॉन्स्युलर अॅक्सेस) मिळवून द्यावी, असे भारताने पाकिस्तानला सांगितले आहे. जाधव यांना दूतावासाची मदत देण्यासाठी पाकिस्तानने भारतासमोर जाधव आणि भारतीय अधिकाऱ्यांची भेट होईल त्याठिकाणी पाकचा एक अधिकारी उपस्थित राहील, भेटीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील आणि भारतीय अधिकारी आणि जाधव यांच्यात होणारी चर्चा रेकॉर्ड केली जाईल, अशा अटी ठेवल्या होत्या. भारताने त्या मान्य करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

‘जालियनवाला’ विधेयकाला लोकसभेत मंजुरी 

नवी दिल्ली : जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारक (संशोधन) विधेयक, २०१९ला शुक्रवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली. या विधेयकात विश्वस्तांमधून काँग्रेस अध्यक्षांचे नाव कमी करण्याची व लोकसभेतील सर्वांत मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचा समावेश करण्याची तरतूद आहे. या विधेयकाला विरोध दर्शवत काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान, ‘जालियनवाला बाग एक राष्ट्रीय स्मारक असून, या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आम्ही या स्मारकाला राजकारणातून मुक्त करू इच्छित आहोत, असे याविषयी बोलताना सांस्कृतिकमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी नमूद केले.