Home क्रीडा इंग्लंडला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या रॉयला झाली ही मोठी शिक्षा

इंग्लंडला फायनलमध्ये पोहचवण्यात महत्त्वाचा वाटा उचललेल्या रॉयला झाली ही मोठी शिक्षा

2019 विश्वचषकात काल(11 जूलै) दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. इंग्लंडच्या या विजयात सलामीवीर फलंदाज जेसन रॉयने महत्त्वाची भूमिका निभावली.

मात्र एजबस्टर्नवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयने त्याला बाद दिल्यानंतर पंचाच्या निर्णयावर असंतोष दाखवल्याबद्दल आयसीसीने मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला आहे.

रॉयने या सामन्यात 65 चेंडूत 85 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र तो ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 19 व्या षटकात बाद झाला.

यावेळी पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रॉयचा झेल यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेने घेतला असल्याचे अपील ऑस्ट्रेलियाने केले होते. त्यावर मैदानावरील पंच धर्मसेना यांनी त्याला बाद दिले.

मात्र रॉयने धर्मसेना यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि रिव्ह्यूची मागणी केली. पण इंग्लंडकडून त्याआधीच जॉनी बेअरस्टोने अयशस्वी रिव्ह्यू घेतला असल्याने इंग्लंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे रॉयला परत माघारी परतावे लागले.

रॉयने धर्मसेना यांच्यावर नाराजी व्यक्त केली त्यावेळी मैदानावरील दुसरे पंच मरेस इरासमस यांनाही मध्यस्थी करावी लागली.

रॉयच्या या कृत्यामुळे त्याला आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेतील लेव्हल 1चे उल्लंघन केल्याप्रकरणी मॅच फिच्या 30 टक्के दंड करण्यात आला आहे.

याबद्दल आयसीसीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की ‘रॉयने आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी असलेल्या आचारसंहितेतील कलम 2.8 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या निर्णयाबद्दल असंतोष जाहिर करण्याबद्दल आहे. त्यामुळे त्याला 30 टक्के दंड आणि 2 डिमिरिट पॉइंट देण्यात येत आहे.’

रॉयने त्याची चूक मान्य केली असून सामनाधिकारी रंजन मदुगलेंनी दिलेली शिक्षाही मान्य केली आहे.