Home बातम्या महत्वाच्या बातम्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आजपासून कागदपत्रांची पडताळणी

इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आजपासून कागदपत्रांची पडताळणी

पुणे: अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारी सुरूवात झाली असून तंत्र शिक्षण विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या सुविधा केंद्रात आज ( मंगळवारी दि. २५ )पासून सर्व कागदपत्रांची तपासणी करून विद्यार्थ्यांचा अर्ज निश्चित केला जाणार आहे. पुणे विभागीताल १०६ सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांना अर्ज तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही,याची दक्षता घ्यावी,अशा सुचना तंत्र शिक्षणविभागातर्फे संबंधित सुविधा केंद्रांच्या प्रमुख्यांना देण्यात आल्या आहेत.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.त्यानुसार 24 जूनपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येणार आहे.तर येत्या २५ जून ते १ जुलै या कालावधीत कागदपत्रांची तपासणी करून प्रवेशासाठी अर्ज निश्चित करता येईल.खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.
विद्यार्थी आपल्या घराजवळील कोणत्या सुविधा केंद्रात जाऊन कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश अर्ज निश्चित करू शकतात.पुणे शहरात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी),मॉर्डन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,शिवाजीनगर,जी.एच.रायसोनी इंजिनिअरिंग कॉलेज ,वाघोली,मराठवाडा मित्रमंडळाचे इंजिनिअरिंग कॉलेज,कर्वेनगर,सिंहगड  इंजिनिअरिंग कॉलेज,वडगाव,मराठवाडा मित्र मंडळ इंस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी,लोहगाव,पीआयसीटी-धनकवडी,भारती विद्यापीठ इंजिनिअरिंग कॉलेज, कात्रज,झील एज्युकेशन सोसायटीचे इंजिनिअरिंग कॉलेज,न-हे आदी सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना कागदपत्रांची तपासणी करता येईल.
विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मधून महाविद्यालयांचे पसंती क्रमांक भरता येईल.पहिला पसंतीक्रम टाकलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल.तसेच प्रवेशाबाबतची माहिती निश्चित करण्यासाठी अ‍ॅडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर (एआयसी)अर्ज फ्लोट किंवा फ्रिज करता येईल.तसेच बेटरमेंटसाठी थांबता येईल.प्रवेशाबाबतच्या आवश्यक सूचना सीईटी-सेलतर्फे प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
———
विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास स्वत:च्या लॉग इन आयडीमधील मेसेज बॉक्समधून तक्रार करता येईल.या तक्रारीची दखल घेवून संबंधित विद्याथ्यार्ची तांत्रिक अडचण दूर केली जाईल,असे डीटीईच्या अधिका-यांकडून कळविण्यात आले आहे.

प्रवेश शुल्क पुन्हा जमा होणार
सीईटी-सेलतर्फे राबविण्यात आलेली प्रवेश प्रक्रिया काही कारणास्तव रद्द करण्यात आली.मात्र,पहिल्या प्रवेश प्रकियेअंतर्गत दोन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाबरोबर शुल्कही जमा केले होते.या विद्यार्थ्यांचे शुल्क सीईटी सेलकडून पुन्हा संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुढील दोन आठवड्यात जमा केले जाणार आहे. सीईटी-सेलतर्फे संबंधित विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.