Home शहरे पुणे इंद्रायणी नदीत कार कोसळली; १ वाचला, २ बेपत्ता

इंद्रायणी नदीत कार कोसळली; १ वाचला, २ बेपत्ता

0

लोणावळाः मावळ तालुक्यातील टाकवे ब्रूदुक येथील इंद्रायणी पुलावरून वेगात आलेली स्विप्ट डिझायर कार पुलाचा लोखंडी संरक्षक कठडा तोडून इंद्रायणी नदीत कोसळली. या कारमधील तिघांपैकी एकाने प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर पडत वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्यातून पोहत किनारा गाठला व कसाबसा जीव वाचविला अन्य दोघेजण कारसह नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. ही घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. शिवदुर्ग व एनडीआरएफचे जवान नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात शोध घेत आहेत. 

कार चालक संकेत नंदु असवले (वय २०), अक्षय मनोहर जगताप (वय २०, दोघेही रा. टाकवे ब्रुद्रुक, मावळ) अशी कारसह नदी वाहून गेलेल्या दोन्ही युवकांची नावे असून, अक्षय संजय ढगे (वय २०, रा. टाकवे ब्रुद्रुक, मावळ) याला आपला जीव वाचविण्यात यश आले. 

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत असवले, अक्षय जगताप व अक्षय ढगे हे तीन मित्र असवले यांच्या स्विप्ट डिझायर कारने काही कारणानिमित्त कान्हे मावळ येथे गेले होते. कान्हे येथून घरी टाकवे येथे येताना कान्हे टाकवे रोडवरील टाकवे गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पुलावरून जाताना कार भरधाव वेगात पुलावरील लोखंडी संरक्षक कठडे तोडून नदीत कोसळली. या कारमध्ये असलेल्या तिघांपैकी अक्षय ढगे याने प्रसंगावधान राखत कारमधून सुटका करून वेगाने वाहणाऱ्या नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून पोहत नदीचा किनारा गाठत स्वःताचा जीव कसाबसा वाचविला. 

मागील सहा दिवसांपासून मावळात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असल्याने नदी अद्याप दुधडी भरून वाहत आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. माहिती समजताच टाकवे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती वडगाव मावळ पोलिसांना समजातच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुरेश निंबाळकर व तहसीलदार रणजीत देसाई यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कार व कारमधील दोघांचा शोध घेण्यासाठी लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथक आणि एनडीआरएफ पथकाला प्राचारण केले असून, शिवदुर्गचे कार्यकर्ते व एनडीआरएफचे जवान नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात कसून शोध घेत आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे व पाण्याला मोठा वेग असल्याने दोन्ही पथकाला शोध घेण्यासाठी अडचण येत असून या शोधकार्यात पाणबुडीचा वापर करण्यात आला आहे.