Home बातम्या इथले पोलीस ‘चहा-पाणी’ मागत नाहीत; स्वत: देतात!

इथले पोलीस ‘चहा-पाणी’ मागत नाहीत; स्वत: देतात!

बिकानेर: पोलीस ठाण्यात जाण्याचा अनुभव फारसा चांगला नसतो असा एक समज आहे. त्यामुळे अनेक जण पोलीस ठाण्यात जाणं टाळतात. शहाण्यानं पोलीस ठाण्यापासून चार हात लांबच राहावं असंदेखील म्हटलं जातं. मात्र राजस्थानच्या बिकानेरमधील कालू पोलीस ठाण्यातील परिस्थिती अतिशय वेगळी आहे. पोलीस कायम चहा पाणी घेतात, असा अनुभव असतो. मात्र कालू पोलीस ठाण्यात चक्क पोलिसांकडून चहा पाणी दिलं जातं. 

देशभरातील 15,666 पोलीस ठाण्यांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेलं कालू पोलीस ठाणं अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या पोलीस ठाण्यातील कर्मचारीवर्ग कायम मदतीसाठी तत्पर असतो. तक्रार करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला चहा पाणी दिलं जातं. याशिवाय दुरून आलेल्या व्यक्तीला जेवणदेखील देण्यात येतं. कालू पोलीस ठाण्याचा परिसर अतिशय स्वच्छ आहे. या ठिकाणी पान, तंबाखू खाऊन मारण्यात आलेल्या पिचकाऱ्यांचे डाग कुठेही दिसत नाहीत. 

महिलांसाठी स्वतंत्र मदत कक्ष, बॅटमिंटन कोर्ट अशा सुविधा कालू पोलीस ठाण्यात आहेत. पोलीस ठाण्यात आणि परिसरात आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून ते पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या स्मार्टफोनसोबत जोडण्यात आलं आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील संशयास्पद हालचालींची माहिती सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मोबाईलवर मिळते. ई-एफआयआरच्या माध्यमातून पोलीस ठाणं डिजिटल करण्यात आल्याचं स्टेशन हाऊस ऑफिसर देवी लाल यांनी सांगितलं. याशिवाय आरोपपत्रदेखील ऑनलाइन अपडेट केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.