बेंगळुरू: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या ‘इन्फोसिस’ने जून २०१९अखेर संपलेल्या तिमाहीमध्ये आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२०च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने ५.२ टक्क्यांच्या वाढीने ३,८०२ कोटींचा नफा मिळवला आहे. त्याचवेळी कंपनीने १३.९ टक्क्यांच्या वाढीसह २१,८०३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. ‘इन्फोसिस’चे सीईओ आणि एमडी सलील पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहककेंदि्रत सेवा आणि गुंतववणूक यांमुळे ही कामगिरी करणे शक्य झाले आहे. कंपनीच्या दमदार कामगिरीमुळे चालू वर्षासाठी महसुलातील वाढ साडेसात ते साडेनऊ टक्क्यांवरून साडेआठ ते १० टक्क्यांवर नेण्यातही यश आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०२०मध्ये वार्षिक लाभांश, बायबॅक आणि विशेष लाभांशाच्या माध्यमातून आगामी पाच वर्षांत ८५ टक्के रोख रकमेचा निधी भागधारकांना देण्यात येणार आहे. डॉलरमध्ये पाहिले असता, पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल २.३ टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीदरम्यान कंपनीच्या डिजिटल महसुलात वार्षिक आधारावर ४१.९ टक्क्यांची वाढ होऊन तो १११.९ कोटी डॉलरवर पोहोचला असून, तो एकूण महसुलाच्या ३५.७ टक्के आहे. ‘इन्फोसिस’ने शेअर बाजाराची वेळ संपल्यानंतर आर्थिक निकाल जाहीर केले. तत्पूर्वी मुंबई शेअर बाजारात कंपनीचा समभाग ७२३.३० रुपयांवर उघडला आणि ०.८७ टक्क्यांच्या मजबुतीने ७२७.१० रुपयांवर बंद झाला.