इरई नदी पुनरुज्जीवन अभियान लोकचळवळ व्हावी– पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

इरई नदी पुनरुज्जीवन अभियान लोकचळवळ व्हावी– पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद
- Advertisement -

चंद्रपूर, दि. १२ एप्रिल :  इरई नदी ही चंद्रपूर शहराला 9 किलोमीटर समांतर वाहते. चंद्रपूर शहर ते वर्धा नदी संगमपर्यंतच्या 17 किमी नदीपात्रातील वाढलेली झाडे झुडपे आणि गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच इराई नदीपात्राची पूरवहन क्षमता वाढविणे यासाठी नदी पुनरुज्जीवन अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

इरई नदीच्या पुनरुज्जीवन अभियानसंदर्भत वन अकादमी येथे आयोजित बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून इरई नदी पुनरुज्जीवन अभियान जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ 25 एप्रिल रोजी होणार आहे. इरई नदी खोलीकरण लोक चळवळ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी –कर्मचारी, जिल्ह्यातील सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी यात हिरहिरीने भाग घेऊन आपले योगदान द्यावे. हे अभियान आपले आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे.  नदी काठावरील जागेवर असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खाली भूखंडावर यापुढे कोणतीही बांधकाम होणार नाही, यासाठी प्रभावी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच सद्यस्थितीत नदीकाठावर असलेल्या अतिक्रमणबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिल्या.

आमदार मुनगंटीवार यांनी केल्या सूचना : डब्ल्यूसीएल ने या उपक्रमात उदार होऊन साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत करावी. सीटीपीएस ने सुद्धा गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे. यातून निघणारा गाळ हा शहरातील खोलगट भाग असलेल्या जागेवर टाकून मैदान तयार करता येईल का, याबाबत नियोजन करावे. नदी पात्रामधील अतिक्रमणाच्या विषयाचे योग्य नियोजन करावे. 17 किलोमीटर मध्ये झुडपे आणि गाळ काढण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे. तसेच इरई नदी निरंतर वाहण्यासाठी बंधारे बांधावे. नदी पुनरुज्जीवनासाठी पाच वर्षाचा कार्यक्रम ठरवावा.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, इराई नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत पाच लक्ष ब्रास गाळ काढण्याचे नियोजन आहे. सदर काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय प्रशासनाने ठेवले आहे. नदीच्या पात्रातून निघणारा गाळ कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच यातून निघणारी वाळू ही घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. डब्लूसीएल आणि औष्णिक विद्युत केंद्राने गाळ काढण्यासाठी साहित्य तसेच आर्थिक मदत करावी, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मशीन उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन : इरई नदीचे पुनरुज्जीवन हा एक सामाजिक उपक्रम आहे. शहराला पडणारा पुराचा वेढा, यापासून मुक्ती मिळण्यासाठी सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध स्तरावरून निधीचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा मानस असून सर्वात प्रथम शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी या उपक्रमासाठी आपला एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

००००

- Advertisement -