‘इस्टर्न फ्री वे’ला विलासराव देशमुखांचे नाव, रितेश देशमुखने मानले आभार

- Advertisement -

मुंबई : मुंबईतील पूर्व द्रूतगती मार्गाला (इस्टर्न फ्री वे) माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नगरविकास विभागाला देण्यात आल्या. अजित पवारांनी यासंदर्भात ट्विट केले होते. आता या ट्विटला रिप्लाय देत विलासराव देशमुखांचे सुपूत्र आणि अभिनेते रितेश देशमुखने आभार मानले आहे.

मुंबईतल्या ‘इस्टर्न फ्री वे’ ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. असे ट्विट अजित पवारांनी केले होते. या ट्विटला रितेश देशमुखने रिप्लाय देत आभार मानले आहे. श्री विलासराव देशमुखजींनी केलेल्या कामाला आज तुम्ही मान दिला, त्या बद्दल – मुलगा म्हणून मी सदैव आपला आभारी राहीन. असे ट्विट रितेश देशमुखांनी केले.

राज्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा आणि महसुलवाढीसंदर्भात परिवहन विभागाची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिवहनसेवा सुधारण्यासंदर्भात अनेक सूचना केल्या. स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री म्हणून मुंबईच्या विकासाला दिलेली दिशा तसेच ‘इस्टर्न फ्री वे’च्या उभारणीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन ‘इस्टर्न फ्री वे’ला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

- Advertisement -