कोल्हापूर : बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी आणि करचुकवेगिरीच्या संशयावरून कोल्हापूर, इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथे सक्तवसूली संचलनालयाच्या पथकांनी ४ बड्या व्यावसायकांवर बुधवारी सायंकाळी छापे टाकले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या छाप्यांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.
कोणावर टाकले छापे ?
कोल्हापूरमध्ये बांधकाम व्यावसायिक, जयसिंगपूर येथे वैद्यकिय व्यावसायिक, इचलकरंजीत माजी नगरसेवक, सराफा व्यावसायिकांवर इडीने छापे टाकले. रात्री उशीरापर्यंत तपासणीचे काम सुरु होते.
काय आहे संशय ?
कोल्हापूरमधील बांधकाम व्यावसायिकावर बेहिशेबी मालमत्ता आमि कर चुकविल्याचा संशय आहे. तर इचलकरंजीतील माजी नगरसेवकाने कर चुकवेगिरी आणि वेगवेगळ्या उद्योगांद्वारे मालमत्ता जमविल्याचा संशय आहे. त्यासोबतच इचलकरंजीतील सराफा व्यावसायिकानेही उद्योगाचा पसारा वाढविला असून जयसिंगपूरमधील वैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या बड्या व्यक्तीवर छापा टाकला आहे.
मंगळवारी ईडीची दोन विशेष पथके कोल्हापूरमध्ये दाखल झाली. बुधवारी दिवसभर या पथकांनी संबंधितांची कार्यालये, निवसस्थाने आणि वेगवेगळ्या साईटमध्ये झाडाझडती सुरु केली. ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती. तर आज पुन्हा तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.