हायलाइट्स:
- प्रताप सरनाईकांचा लेटरबॉम्ब
- संजय राऊतांची भाजपवर टीका
- ईडीच्या कारवाईवरही केली टीका
संजय राऊत यांनी आज सामानातील रोखठोक सदरातून अनिल देखमुख व प्रताप सरनाईकांवरील ईडीच्या कारवाईबाबत भाजपवर सडकून टीका केली आहे. तसंच, ‘प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयावर कारवाई केल्यानं ते भाजपमध्ये जातील हा गैरसमज आहे, असंही ते म्हणाले आहेत. माझे स्वतः सरनाईक यांच्याशी बोलणे झाले असून सरनाईक ठामपणे म्हणाले, मी शिवसेनेत राहूनच लढेन. सरनाईक यांची अवस्था पाहून शिवसेनेची अवस्था बिकट होईल असे कोणाला वाटत असेल तर तो भ्रम आहे,’ असंही राऊतांनी ठणकावलं आहे.
वाचाः पंतप्रधानांच्या भेटीनंतरही ‘जीएसटी’बाबत राज्याच्या तोंडाला पाने
‘सरनाईक यांना सुरुवातीला ईडीचे समन्स आले तेव्हा भाजप व ईडीच्या अन्यायाशी शेवटपर्यंत लढेन असं त्यांनी सांगितलं. अर्णब गोस्वामीविरुद्ध हक्कभंग आणून खळबळ माजवणारे सरनाईक असे हतबल का झाले?, आमदार सरनाईक यांचा त्रागा मुख्यमंत्र्यांना असे टोकाचे पत्र लिहण्यापर्यंत का गेला?’ असे सवाल राऊतांनी केले आहेत.
‘ईडीच्या कार्यालयातून बोलावले जाते व मूळ गुन्ह्याशी संबंध नाही असे सर्वकाही विचारले जाते. हा दबाव टाकण्याचाच प्रकार आहे. हे सर्व आता सरनाईक यांनी हायकोर्टात एक याचिका दाखल करुन सांगितलं. सरनाईक व त्यांच्यासारख्या अनेकांचे हेच सांगणे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींची ही कौफियत जोरकसपणे पंतप्रधानांकडे मांडायला हवी,’ असी मागणी राऊतांनी केली आहे.
वाचाः सरनाईकांच्या लेटरबॉम्बचे हादरे?; मुख्यमंत्री भेटीनंतर राऊतांचे मोठे विधान
‘महाराष्ट्रात व इतरत्र आमदारांना विनाकारण त्रास देणे सुरुच आहे. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव कोणता? तर अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा आणि त्यासाठी आधार काय? तर जो अधिकारी आरोपी असून अटकेत आहे त्याने बेछूट आरेप केलेले पत्र. आरोपी म्हणून अटकेत असलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्रावर सीबीआय चौकशीची मागणी कशी केली जाऊ शकते? असा सवाल करतानाच राज्यातील तपास यंत्रणेवर विरोधी पक्षाचा विश्वास नसावा हे बरे नाही. याच यंत्रणेमुळं भाजपचे माजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर घरी जाण्याची वेळ आली होती. आज भाजप विरोधी पक्षात बसल्यावर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणा आठवली का? या त्रासातून एकेकाळी स्वतः अमित शहाही गेले आहेत. त्यामुळं आमदार-खासदारांचे दुःख त्यांना समजून घेता आले पाहिजे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
वाचाः कोविड नियम मोडून वाढदिवस; आमदार संग्राम जगताप गोत्यात