ईशान्य भारताचा विकास साधताना सांस्कृतिक अस्मिता जपणे आवश्यक –  राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १४: ईशान्य भारताचा विकास साधताना तेथील समृद्ध सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि स्वतंत्र ओळख जपणे आवश्यक आहे. विकास आणि सांस्कृतिक वारसा यांची सांगड घालून ईशान्य भारताला देशाच्या विकासप्रवाहात अधिक सक्षमपणे जोडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. मुंबईच्या राष्ट्रीय शेयर बाजार येथे आयोजित ‘नमस्ते पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

    मुंबई आणि ईशान्य भारतातील संबंध अधिक दृढ करण्याची गरज – राज्यपाल

    ईशान्य भारतात पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. या संपर्क व्यवस्थेचा उपयोग उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी झाला पाहिजे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, मुंबई आणि ईशान्य भारत यांच्यातील आर्थिक, सांस्कृतिक व भावनिक संबंध अधिक दृढ होण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘नॉर्थ ईस्ट-महाराष्ट्र कनेक्ट’ उपक्रम राबविण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्याचे राज्यपालांनी सांगितले. ईशान्य भारताकडे गुंतवणूक आणि उद्योगांच्या नव्या संधींचे केंद्र म्हणून पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

    ईशान्य भारताच्या विकासासाठी केंद्र सरकारचे ऐतिहासिक प्रयत्न – मंत्री मंगलप्रभात लोढा

    ईशान्य भारताला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी आणि मदन दासजी यांनी १९९१ पासून गेली ३५ वर्षे सातत्याने योगदान दिले आहे. ईशान्य भारत हा देशाचा मुकुटमणी असून तेथील निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मुंबईतील अनेक कुटुंबे ईशान्य भारतातून शिक्षण व रोजगारासाठी येणाऱ्या तरुणांना आपुलकीने आधार देतात, ही अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, विमानतळ आणि दळणवळण व्यवस्थेचा विस्तार केला आहे, असे कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

    ईशान्य भारताची संस्कृती, विकास आणि यशोगाथा देशासमोर आणण्याचा ‘नमस्ते’ उपक्रम – अतुल कुलकर्णी

    एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘देखो अपना देश’ या संकल्पनांना अनुसरून ईशान्य भारतातील आठ राज्यांची संस्कृती, परंपरा, नैसर्गिक संपदा आणि विकासाच्या संधी देशासमोर आणण्यासाठी ‘नमस्ते’ उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक समुदायांचे कार्य, शाश्वत विकासाच्या पारंपरिक पद्धती आणि विविध क्षेत्रांतील यशोगाथांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदाच्या ‘नमस्ते पुरस्कार २०२६’ साठी पाच विविध श्रेणींमध्ये ४०० हून अधिक नामांकने प्राप्त झाली होती, अशी माहिती अमेझिंग नमस्ते फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी दिली.

    विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल मान्यवरांचा गौरव

    या सोहळ्यात प्रसिद्ध रेशीमशेती शास्त्रज्ञ व पद्मश्री डॉ. जोगेश देउरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागालँडमधील ‘रुझा शेती पद्धती’ला शाश्वतता आणि पर्यावरण व्यवस्थापनातील योगदानाबद्दल गौरविण्यात आले. अरुणाचल प्रदेशच्या दिमुम पेर्टिन यांना देशी शेती, भरडधान्य संवर्धन आणि महिला सक्षमीकरणातील कार्याबद्दल, तर मणिपूरचे युम्नाम भूमेश्वर सिंह यांना नाट-संकीर्तन आणि पारंपरिक पुंग वाद्याच्या जतनातील योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. मिझोरममधील सेरछिप जिल्ह्याचे उपायुक्त पॉल एल. खुमा यांना आदर्श जनसेवा आणि प्रशासकीय कार्यासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    या कार्यक्रमात ‘ओरिजिन ऑफ लूम्स’ हा फॅशन शो आयोजित करण्यात आला. या फॅशन शोमध्ये ईशान्य भारतातील विविध राज्यांची पारंपरिक वस्त्रे, वस्त्ररचना आणि स्थानिक कारागिरांची कलाकुसर सादर करण्यात आली.

    या कार्यक्रमास राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महाराष्ट्राच्या राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन तसेच ईशान्य भारतातील विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    ०००

    - Advertisement -