Home शहरे पुणे ‘ई-संजीवनी’मुळे ३८ हजार रुग्णांना लाभ

‘ई-संजीवनी’मुळे ३८ हजार रुग्णांना लाभ

0
‘ई-संजीवनी’मुळे ३८ हजार रुग्णांना लाभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यात गेल्या वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी (बाह्यरुग्ण) सेवेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दररोज किमान ३०० रुग्ण त्याद्वारे वैद्यकीय उपचार आणि सल्ला घेत आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत ३७ हजार ८९१ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांनी त्याचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली.

गेल्या वर्षी लॉकडाउनकाळात रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय उपचार आणि सल्ला मिळावा, यासाठी १३ एप्रिलला ऑनलाइन ई-संजीवनी सेवा सुरू केली होती. सुरुवातीला वेबसाइट व नंतर त्याचे मोबाइल ॲपही विकसित केल्याने त्याचा वापर वाढल्याचे दिसून आले. ई-संजीवनी ओपीडी सेवा मोफत आहे. या माध्यमातून डॉक्टरांची ओपीडी सेवा सुरू केली आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांत सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ‘अॅप’मध्ये केली आहे. दिवस ठरवून दिल्याप्रमाणे सर्व वैद्यकीय अधिकारी या सेवेमार्फत रुग्णांशी त्यांच्या आजारावर सल्लामसलत करीत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दररोज सकाळी नऊ ते एक आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी पाच या वेळेत ही सेवा घेता येते. ‘एसएमएस’द्वारे ई-प्रिस्क्रिप्शनही रुग्णांना मिळते. त्याद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधे घेऊ शकतात.

संवाद कसा साधाल ?

ई – संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात. अॅन्ड्रॉइड मोबाइलमध्ये ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये जाऊन esanjeevani OPD National Telconsultation Service या नावाचे अॅप डाउनलोड करता येईल.

Source link