Home ताज्या बातम्या उत्कृष्ठ सेवेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवून शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करा – पालकमंत्री संजय राठोड

उत्कृष्ठ सेवेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवून शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करा – पालकमंत्री संजय राठोड

0
उत्कृष्ठ सेवेद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडवून शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ दि. 02 ऑक्टोबर (जिमाका) : शासन व प्रशासनाने दिलेल्या उत्कृष्ठ सेवेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लागल्यास त्यांना दिलासा मिळून शासनाबद्दल चांगले मत तयार होते व जनसामान्यात शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होते. यवतमाळ जिल्ह्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वात सेवा पंधरवाडा अंतर्गत चांगले काम केल्याबद्दल मी त्यांचे व सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करतो, असे गौरवोद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी आज काढले.

सेवा पंधरवाड्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नुतन महसूल भवनात विविध 24 विभागाच्या लाभार्थ्यांना देय लाभ व प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन तयार करण्यात आलेल्या बळीराजा समृद्धी महसुल सभागृहचे लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार प्रा. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

आमदार प्रा. अशोक उईके यांनी 17 सप्टेंबर या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबर या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत शासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून नागरिकांना तत्परतेने दिलेल्या सेवेबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून सांगितले की सेवा पंधरवाडा अंतर्गत मागील 15 दिवसात सर्व विभागामार्फत विविध प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यास प्राधाण्य देण्यात आले. जिल्ह्यातील प्रलंबित वन हक्क दाव्याची सर्व प्रकरणे निकाली काढल्याचेही त्यांनी सांगितले. सेवा पंधरवाड्यानंतरही नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकरी डॉ. श्रीकृ्ष्ण पांचाळ यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत ‘शालेय इमारत.. शिकण्याचे साधन’ अर्थात ‘बाला’ व शिक्षण प्रक्रीयेला गती देणारा ‘झेप’ हे दोन उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले. या उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड व मान्यवरांच्या हस्ते शेतकरी आत्महत्या प्रकरणात मदत निधीचे धनादेश, तृतीयपंथीना ओळख प्रमाणपत्र, दिव्यांगांना यु.आय.डी. कार्ड, वनहक्क दावे मंजुरीचे प्रमाणपत्र, शिधापत्रीकेचे वाटप, संजय गांधी योजनेचा लाभ, घरगुती वीज जोडणी, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन नावे नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरी करीता ऑनलाईन नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता कर प्रमाणपत्र, प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत मेरी पॉलीसी मेरे हाथ बाबत प्रमाणपत्र, ऑनलाईन मिळकत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच मतदार ओळखपत्र आधार लिंक करणाऱ्या बी.एल.ओ. यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘बळीराजा समृद्धी महसुल सभागृहाचे’ उत्कृष्ट बांधकामात परिश्रमपुर्वक सहभाग नोंदविल्याबद्दल उपविभागीय अभियंता प्रवीण कुळकर्णी, कंत्राटदार पांडुरंग खांदवे, रमेश मुंदडा व वास्तुशिल्पकार आशिष खांदवे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, भुमी अभिलेख अधीक्षक श्री गुंडे, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, तसेच इतर विभागाचे संबंधीत अधिकारी व विविध योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

000