Home ताज्या बातम्या उत्तर प्रदेशसरकारनं स्पेशल बसेसमधून कोट्यातील विद्यार्थ्यांना नेलं, महाराष्ट्राचे विद्यार्थी प्रतीक्षेतच

उत्तर प्रदेशसरकारनं स्पेशल बसेसमधून कोट्यातील विद्यार्थ्यांना नेलं, महाराष्ट्राचे विद्यार्थी प्रतीक्षेतच

0

मुंबई : राजस्थान राज्यातील कोटा शहरामध्ये जेईई, नीटसारख्या प्रवेश परिक्षांचं कोचिंग घेण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. तिथे महाराष्ट्राचे विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात आहेत. पण लॉकडाऊननंतर मात्र हे विद्यार्थी कोटामध्येच अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे क्लास बंद आहेत. तसंच शहरातल्या मेसही बंद आहेत. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.

ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारनं स्पेशल बसेसमधून कोट्यातील त्यांच्या विद्यार्थ्यांना नेलं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारनंही काहीतरी व्यवस्था करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. जर सरकारला बस पाठवणं शक्य नसेल आम्हाला आमच्या पातळीवर प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४६६६ वर पोहोचली आहे. सोमवारी नवीन ४६६ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ५७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी नऊ तर आतापर्यंत २३२ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

दुसरीकडे मुंबईतील करोनाबधितांचा आकडा ३०९० वर गेला आहे. २४ तासांत १५५ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर खासगी प्रयोगशाळांतील १३७ रुग्णांचे अहवाल पालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सोमवारी एकूण २९२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण १३८ जणांनी प्राण गमावले आहेत. तर अजून ३६३ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सोमवारी ८४ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून आतापर्यंत ३९४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.