Home ताज्या बातम्या उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा ,विधानपरिषदेच्या निवडणूका जाहीर, 21 मे रोजी मतदान

उद्धव ठाकरेंचा मार्ग मोकळा ,विधानपरिषदेच्या निवडणूका जाहीर, 21 मे रोजी मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर आता निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 11 मेपर्यंत अर्ज करण्याची मुदत असणार आहे. तसेच 21 मे रोजी मतदान होणार असून 26 मे पर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच निवडणूकीची परवानगी देताना आयोगाने कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीसंदर्भातला राजकीय पेच आता संपुष्टात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आमदारकीपदावरुन मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. उद्धव ठाकरेंना राज्यपाल कोट्यातून आमदारी देण्यात यावी असं पत्र महाविकासआघाडीनं राज्यपालांना दिल्यानंतर भाजपने त्यावर याचिका दाखल केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. मात्र आता हा पेच सुटला असून निवडणूक आयोगानं निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यामुळं आता 21 मे रोजी मतदान होणार असून उद्धव ठाकरेंचा आमदारकीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.