Home ताज्या बातम्या ‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’

‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’

0
‘उद्धव ठाकरेंनी आषाढी एकादशीला शरद पवारांनाच अभिषेक करावा’

हायलाइट्स:

  • पंढरपूरच्या पायी वारीवरून भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • संजय राऊत यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा आधार घेत केली टीका
  • उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनाच अभिषेक करावा – अतुल भातखळकर

मुंबई: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढीच्या पायी पंढरपूर वारीला राज्य सरकारनं परवानगी नाकारली आहे. काही वारकऱ्यांचा या निर्णयाला विरोध आहे. भारतीय जनता पक्षानंही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. (BJP MLA Atul Bhatkhalkar Taunts CM Uddhav Thackeray)

‘शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत’ अशा आशयाचं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. राऊत यांच्या या विधानाचा भाजपनं तेव्हा निषेध केला होता. वाचाळवीर राऊत यांनी विठ्ठलनामाचं पावित्र्य घालवल्याची टीका भाजपनं केली होती. आता महाविकास आघाडीच्या सरकारनं पायी वारीवर बंदी घातल्यानंतर भाजपनं पुन्हा सरकारला घेरलं आहे.

वाचा: ‘मुख्यमंत्र्यांनी टाळ्या, थाळ्यांची भंपकबाजी न करता काम केलं’

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केलं आहे. संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा आधार घेत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ‘सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारनं आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा. म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,’ असं भातखळकर यांनी वारकऱ्यांचा हवाला देऊन म्हटलं आहे.

Atul Bhatkhalkar Tweet

अतुल भातखळकर यांचं ट्वीट

भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच पायी वारीचा हट्ट धरला होता. कोणत्याही परिस्थितीत पायी वारी होणारच, अशी भूमिका भाजपनं घेतली होती. मात्र, राज्य सरकारनं केवळ मानाच्या पालख्या मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत एसटी बसमधून नेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळं भाजप अधिकच आक्रमक झाला होता. पायी वारीच्या पहिल्या दिवशी आपल्या समर्थकांसह पायी वारीला निघालेले हभप बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले होते. त्यावरूनही भाजपनं सरकारवर टीका केली होती. आता त्याही पुढं जाऊन शासकीय विठ्ठलपूजेवरून भाजपनं मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

वाचा: ‘मुंबई शहर योग्य व्यक्तींच्या हातात असल्याचा आनंद आहे’

Source link