अंधेरी पश्चिमेतील चार बंगला येथील अंधेरी कामगार नगर गृहनिर्माण संस्था ही एसआरए पुनर्विकास योजनेचा भाग ठरली. इथला भूखंड जिल्हाधिकारी कार्यालय अखत्यारीत येत असल्याने तिथे नियमानुसार एसआरए योजनेतील गृहनिर्माण संस्था, विकासक आणि उद्यानासाठी राखीव जागा या पद्धतीने समान स्तरावर तीन भाग करण्यात आले. एसआरए योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर त्याठिकाणी एसआरए अंतर्गत अंधेरी कामगार गृहनिर्माण संस्थेतील इमारतीचा पहिला टप्पा सन २००२ आणि दुसरा टप्पा सन २००४मध्ये पूर्ण झाला. त्या दोन्ही इमारतींमध्ये मिळून २४० घरे आहेत.
अंधेरी कामगार नगर गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास साध्य झाला तरीही योजनेप्रमाणे मूळ भूखंडावरील प्रस्तावित उद्यान अद्याप कागदावरच राहिले आहे. त्यास १८ वर्षे उलटून जात असतानाही उद्यानाच्या जागेवर कामगारांसाठी बांधलेल्या झोपड्या अजूनही कायम आहेत. तिथे सध्या ९० झोपड्या असून त्यापैकी ४० झोपड्यांमध्ये कामगारांची कुटुंबे राहत आहेत. उद्यानासाठी जागा राखीव असतानाही तिथे झोपड्या अजून हटविण्यात आलेल्या नाहीत. त्याविषयी गृहनिर्माण संस्थेने गृहनिर्माण विभाग, एसआरए प्राधिकरणाशी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याबाबत गृहनिर्माण संस्थेस कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
या ठिकाणचे प्रस्तावित उद्यान सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपयुक्त, महत्त्वाचे आहे. तरीही, उद्यान कार्यान्वित होण्यासाठी कमालीची उदासीनता दिसत असल्याची प्रतिक्रिया अंधेरी कामगारनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांनी दिली आहे.
आमदारांच्या पत्रांनंतरही हालचाल नाही
प्रस्तावित राखीव उद्यान अजूनही पूर्ण न होत नसल्याविषयी आमदार अमित साटम यांच्याप्रमाणेच आमदार सुनील प्रभू, तत्कालीन आमदार अशोक जाधव यांनीही पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही सरकारी यंत्रणेकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या संदर्भात, विकासकाशी संपर्क साधला असता तिथून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.