जिद्दीच्या जोरावर सर्व संकटांवर मात करून यश मिळवणारे अवलिया जगभरात भेटतात. अगदी सर्वसामान्य वाटणारा माणूस अशी काही झेप घेऊन जगाला आपली वेगळी ओळख दाखवून देतो की जगभर त्याचे फोलोअर्स निर्माण होतात. त्यापैकीच एक अवलिया उद्योजक म्हणजे बाटा (BATA) कंपनीचे संस्थापक थाॅमस बाटा..!
होय, थाॅमस बाटा यांची उद्योगगाथा जगातील सर्व वेगळा विचार करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि खुल्या विचारांनी सगळ्यांना विकासाची संधी देणाऱ्या युरोपातील झेकोस्लोव्हेकिया या देशातील बाटा कुटुंबीय थाॅमस बाटा यांच्यामुळे जगभरात आदराचे स्थान बनले. आपले आडनावच त्यांनी ब्रँड करून टाकले. वाचा त्यांची कथा.
युरोपियन कंपनी
झेकोस्लोव्हेकिया देशातील छोट्याश्या गावात चप्पल आणि बूट बनवून उदरनिर्वाह करण्यात बाटा कुटुंब मग्न होते. मात्र, १८७६ मध्ये या कुटुंबात थाॅमसचा जन्म झाला. पुढे जाऊन आपल्या घरगुती व्यवसायात मदत करतानाच हा उद्योग मोठा करण्याचे स्वप्न थाॅमस बाटा यांनी पहिले. बहिण-भावांच्या मदतीने त्यांनी गावामध्येच एका छोट्या रुममध्ये हा व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, तो चालत नसल्याने कंटाळून भाऊ-बहिणींनी थाॅमस बाटा यांची साथ सोडली. मात्र, थाॅमस हरले किंवा खचलेही नाहीत. परिस्थितीला शरण न जाता झालेल्या चुका स्वीकारून त्यात सकारात्मक बदल करून काम करीत राहिले.
साखळी स्टोअरमधून विक्री
३२० डॉलर खर्च करून त्याकाळी मशीन व इतर सामुग्री त्यांनी खरेदी केली होती. त्यासाठी कर्ज घेतले होते. कर्जाच्या खाईत सापडल्यावरही थाॅमस बाटा यांनी कामावर लक्ष केंद्रित करून आपला वेगळा मार्ग तयार केला. अशावेळी आधुनिक बदल शिकून योग्य मार्गाने व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी न्यू इंग्लंड येथील एका कंपनीत स्वतः आणि इतर तीन कर्मचारी यांना घेऊन काम केले. काम शिकल्यावर त्या मजुरांना घेऊन ते पुन्हा स्वदेशी आले. १९१२ मध्ये त्यांनी एकूण ६०० मजुरांच्या मदतीने युरोपात आपली विक्री साखळी निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले. चप्पल आणि बूट यांच्या दर्जामध्ये त्यांनी कधीही कसूर केली नाही. अजूनही या बाटा कंपनीची हीच खासियत आहे.
जगभरात विस्तार
बाता न मारता दर्जा व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन केल्यानेच बाटा हा ब्रँड जगभरात नावलौकिकाला साजेसा ठरला. बाटा कंपनीचे स्टोअर सुरू झाल्याने ग्राहकांना दर्जाची खात्री आणखी पटली. पहिल्या जागतिक युद्धामुळे बाजार पडलेला असल्याने त्याचाच उपयोग अधिक उत्पादन करून कमी किमतीत अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची तयारी बाटा कंपनीने केली. महायुद्धाच्या काळात कंपनीची ग्रोथ १५ पटीने झाली. तसेच सुमारे २७ देशात या कंपनीचे स्टोअर सुरू झाले.
भारत देशातही मोठे काम
भारतासह जगभरातील सुमारे १०० देशात सध्या ही कंपनी बूट आणि चप्पल पुरवठा व विक्री करीत आहे. ३० हजार कर्मचारी आणि 5 हजारापेक्षा जास्त रिटेल स्टोअर यासह इतर दुकानदार यांच्या मदतीने कंपनीची उत्पादने विकली जात आहेत. भारतात १९३९ अम्द्ये पश्चिम बंगालमध्ये कान्नोगर येथे पहिली बाटा कंपनी सुरू झाली. आता नंतर हे युनिट बाटागंज येथे हलविण्यात आले. आता यासह फरीदाबाद (हरियाणा), पिनया (कर्नाटक) और होसुर (तमिलनाडु) येथे कंपनीचे पाच युनिट चप्पल, बूट आणि इतर काही उत्पादने बनवीत आहेत. सध्या भारतात या कंपनीचे १ हजार ३७५ स्टोअर असून पाच युनिटमध्ये किमान 8 हजार ५०० मजूर काम करीत आहेत.