Home बातम्या ऐतिहासिक उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

0
उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

औरंगाबाद दि 25 (जिमाका) : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी येथील रस्त्यांसाठी शासनाने 70 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून चांगले रस्ते होणार असल्याने उद्योगांची भरभराट होणार आहे. शिवाय जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण असल्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता शासन कटीबध्द असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत चिकलठाणा, शेंद्रा औद्येागिक क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, मसीआचे अध्यक्ष किरण जगताप यांची उपस्थिती होती.

श्री  सामंत  म्हणाले की, शासन उद्योगाच्या भरभराटीसाठी अनेक योजना राबवित आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत 12 हजार 650 नवउद्योजक  घडविण्यात आले आहेत. तसेच नवसंजीवनी योजना तर उद्योजकांसाठी संजीवनी ठरत आहे. एमआयडीसी  क्षेत्रात पायाभूत सुविधा देण्यात येत आहेत. रस्त्यासाठी देण्यात आलेल्या निधीमधून मजबुत रस्ते तयार होतील आणि येथील उद्योगाची भरभराट होईल असेही ते म्हणाले.

श्री भुमरे म्हणाले या क्षेत्रातील रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी खूप वर्षापूर्वीची आहे. शासनाने रस्त्यांसाठी निधी देऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला खूप मोठी मदत केलेली आहे. उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याची ‍विनंती त्यांनी यावेळी केली.

यावेळी श्री सावे म्हणाले की, चिकलठाणा सर्वांत जुनी एमआयडीसी आहे. या परिसरात अनेक मोठे उद्योग आहेत. शासनाने रस्त्यांच्या कामासाठी निधी दिल्यामुळे सहाजिकच येथील उद्योगांना चालना मिळणार आहे असेही ते म्हणाले.

उद्योगमंत्र्यांच्या हस्ते शेंद्रा एमआयडीसी येथील डिएमएलटी रस्त्याचे कॉक्रिटीकरण, स्कोडा कंपनी ते जलकुंभापर्यंत डी.आय.के. -7 प्रकारची जलवाहिनी टाकणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे ह्या विकास कामाचे देखील भूमिपूजन पार पडले. यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, मसीआचे अध्यक्ष किरण जगताप यांची उपस्थिती होती.