उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने महत्त्वाची भूमिका वठवावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात एक्सएसआयओने महत्त्वाची भूमिका वठवावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
- Advertisement -

  • प्रकल्पामुळे २५०० लोकांना रोजगारासह राज्यातील उद्योगाला नवी दिशा मिळणार

नागपूर, दि. ७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका वठवावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

नागपूर -अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.आशिष देशमुख आणि आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्क चे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशाला ग्लोबल सप्लाय चेनमध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानेही या दिशेने पुढे जाण्यासाठी उद्योगस्नेही धोरण आणले आहे. त्यामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत आहे त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे.

ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला व महाराष्ट्राला  पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय देशासमोर ठेवले असताना हे साध्य करण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची महत्वाची भूमिका ठरते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राची आर्थिक प्रगती राज्यासमोर मांडली. आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र प्रयत्नरत आहे. त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे यास प्रत्यक्षात आणण्यात आजच्या लॉजिस्टिक पार्कची महत्त्वाची भूमिका आहे.नागपूर उद्योगाचे मॅग्नेट बनवताना एक्सएसआयओ जोरकसपणे कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

एक्सएसआयओ ने नेक्स्ट जेन बाबतही देशात अन्य ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारताना नागपुरलाही प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनवताना या पार्कने महत्वाची भूमिका वठवावी असेही ते म्हणाले.

‘एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्क’चे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल यांचे स्वागतपर भाषण झाले.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्सएसआयओ ॲडव्हान्सड्‌ इंडस्ट्रीयल पार्क’ परिसरात गेस्ट हाउसचे उद्‌घाटन व वृक्षारोपण केले.

एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी…

महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच ‘इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड’ औद्योगिक संकुल आहे.

या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हे औद्योगिक संकुल केवळ कारखाना नसून ‘स्मार्ट कॅम्पस’ असेल. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि ‘डिजिटल ट्विन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ऊर्जेची बचत आणि कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

एक्सएसआयओ मार्फत महाराष्ट्रात एकूण ८,१४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५,००० हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

०००

 

- Advertisement -