मुंबई : प्रतिनिधी
कोरोना विषाणूने (कोविड -19) मुळे हातावर पोट भरणाऱ्या अनेक जणांची उपासमारीची वेळ आलेली आहे यातच. माणूसकीचे अनेक रंग पाहावयास मिळत आहेत. अशा परिस्थितीतच सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचीही अनेक रूपं दिसायला लागलीत.
संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीत हातावर पोट असलेल्या वर्गाच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर आहे. अशातच दोन दिवसांपासून जेवण नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या एका महिलेचा जीव वाचवलाय तो मुंबई पोलीसमधील बहादूर शिपाई श्रीकांत शिवाजी देशपांडे यांच्यामुळे.
मालाड पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेले श्रीकांत (बक्कल नंबर- ०९३५६६) हे राहण्यासाठी माता रमाबाई आंबेडकर पोलीस लाईन (रूम नं. ०८/अ विंग, क्रॉफर्डमार्केट, मुंबई) येथे राहायला आहेत. श्रीकांत यांची सध्या रात्रपाळीची ड्युटी आहे. त्यासाठी ते सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मालाड पोलीस स्टेशनला जात असतांना त्यांना भायखळा इथल्या जे.जे. पूलावरून एक महिला खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. त्याचवेळी श्रीकांत यांनी स्वतःची दुचाकी थांबवली आणि त्या महिलेकडे धाव घेतली. श्रीकांत यांना पाहताच महिलेने एक पाय पूलाखाली सोडला, तेवढ्यात समयसूचकता दाखवत श्रीकांत यांनी महिलेला पकडून मागे आणले. त्यावेळी ती महिला काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
मला मरू द्या, मी दोन दिवसांपासून जेवण केलेलं नाही, या जगण्याचा खुप कंटाळा आला, अशा विनवण्या ती करू लागली. एका हातानं महिलेला धरून ठेवत श्रीकांत यांनी तात्काळ 100 नंबरवर फोन करून मदत मागितली. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यातून घटनास्थळी तात्काळ मदत आली. सध्या ही महिला पोलीसांच्या ताब्यात असून तिची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. श्रीकांत यांच्या या समयसूचकतेबद्दल मुंबई पोलिस दलाकडून त्यांचं कौतुक केलं जात आहे.