पुणे दि.१९: भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त नितेश व्यास यांनी आज पुणे विभागातील पुणे,सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला. पुणे विभागातील निवडणूक विषयक कामकाजबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
उप निवडणूक आयुक्त श्री. व्यास यांनी १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण, स्वीप कार्यक्रम तसेच मतदान केंद्राबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील ज्या मतदारांची नोंदणी कमी असेलेल्या भागात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पुणे विभागातील निवडणूक विषयक कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी, आधार जोडणी स्थिती,मतदान केंद्र, मतदार जनजागृती, नवमतदार, तृतीयपंथी मतदार नोंदणी तसेच मतदान प्रक्रियेबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
यावेळी निवडणुक प्रकियेबाबतचे प्रशासकीय नियोजन, आधार जोडणी, स्वीप कार्यक्रमात नाविन्यपूर्ण कामकाज, समाज माध्यमांचा वापर, स्वीप कार्यक्रमाअंतर्गत भविष्यातील नियोजन याबाबतही चर्चा झाली.
यावेळी पाचही जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे जिल्ह्याचे मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.