Home शहरे उस्मानाबाद उमरगा येथील खाजगी आरोग्य सेवेचे अधिग्रहण ! कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचार बंद

उमरगा येथील खाजगी आरोग्य सेवेचे अधिग्रहण ! कोरोना व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचार बंद

उस्मानाबाद । प्रतिनिधी । 6 एप्रिल : जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यात कोरोना बाधित तीन रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उमरगा तालुका सील केला आहे. त्या बरोबरच तालुक्यातील खाजगी आरोग्यसेवा ताब्यात घेऊन म्हणजे अधिग्रहित करून फक्त कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जारी केले आहेत.

उमरगा उपविभागीय जिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू  (covid-19) या संसर्गजन्य आजारा व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचार बंद व शहरासह तालुक्यातील सर्व खासगी रुग्णालये दवाखाने यांच्या इमारती, त्यामधील वैद्यकीय उपकरणे, साधने, रुग्णवाहिकाआणि तेथील डॉक्टर व इतर कर्मचारी यांची सेवा यांचे पुढील आदेशापर्यंत अधिग्रहण करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, तालुक्यातील कोरोना बाधित त्या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध चालू आहे. अशा व्यक्तींना उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

दरम्यान खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफने सरकारी आदेशाची पायमल्ली केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.