
व्यक्तीच्या क्षमतांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि संधींची साथ मिळाली तर तो स्वतःच्या यशस्वी वाटचालीतून, इतरांना प्रेरणा देणारा दिशादर्शक ठरणारा माईलस्टोन प्रवास करतो, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ग्रामविकास विभागातंर्गत ग्रामीन जीवनोन्नती अभियानातून यशस्वी वाटचाल करणाऱ्या अनेक सेल्फमेड उद्योजिका, ज्यांना उद्योग क्षेत्राची, व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना आज घडीला त्यातील किती तरी जणीचे उद्योग व्यवसाय हे लाखांच्या वर आर्थिक उलाढाल करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील रेणापूरच्या मीराबाई स्वय सहायता संघ, संविधान महिला ग्रामसमूह, सिद्धिविनायक प्रभागसंघ, पाळज येथील इयत्ता १० वी नापास असलेल्या विशेष म्हणजे उद्योगाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या अन्नपूर्णा फूड अँड प्रॉडक्ट्सच्या सर्वेसर्वा सुनीता अशोक कावळे यांचा उद्योजिका म्हणून सुरु असलेला यशस्वी प्रवास प्रेरणादायी आणि अभिनंदनीय आहे.
सुनीता कावळे त्यांच्या अन्नपूर्णा फूड ॲण्ड प्रॉडक्स अंतर्गत ११ प्रकारची आवळ्याची उत्पादने बनवतात. त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली ती फक्त ५०० रुपयाच्या भांडवलावर आणि आजघडीला अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टस ९ लाखा रुपयांपर्यंतची उलाढाल करत आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत स्वावंलबनाचा मार्ग शोधण्याच्या धडपडीत आवळ्यासारख्या आरोग्यवर्धक फळातून खाद्य पदार्थ तयार करुन त्याच्या विक्रीतून काही करता येईल या विचाराने अवघ्या पाचशे रुपयात व्यवसाय करु पाहणाऱ्या सुनीता यांचा प्रवास सोपा नव्हता, कारण आर्थिक पाठबळ तर काही नव्हतेच मात्र त्यांच्या आत्मविश्वासाला पूरक पाठिंबा देणारे वातावरण ही घरात नव्हते उलट अवतीभवतीच्या महिलांकडूनही त्यांच्या या प्रयत्नांना टिकेच्या नजरेतून बघितल्या गेले, त्यांच्या धडपडीला गांभिर्याने घेतल्या गेले नाही, तर उलट त्यांना हे जमू शकणार नाही, असे म्हटले गेले, मात्र त्यांच्या मुलींने त्यांना प्रोत्साहन देत पाठिंबा दिल्याने त्या हिमतीने आपल्या व्यवसायात जम बसवण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या.
आज अकरा प्रकारच्या पदार्थांची निर्मिती करणाऱ्या अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टस्ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सुनीता यांनी २०१७ साली आवळ्यावर प्रक्रिया करून छोटेसे उत्पादन सुरू केले. गावात सहज मिळणाऱ्या कच्च्या मालावर आधारित आवळा कँडी, मुरंबा, चूर्ण, लोणचं इत्यादी पदार्थ बनवण्यास त्यांनी सुरवात केली. प्रत्येक गोष्ट त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली. या व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल असलेला आवळा आणण्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली, कधी कधी तर ५०, ६० कि.मी. लांबपर्यंत जाऊन आवळा आणण्यापासून ते तो वाळवणे, त्याच्यापासून उत्पादन तयार करण्यासाठीची सर्व मेहनत घेऊन तो तयार माल बाजारपेठेत विक्री करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पार पाडत पुढे जात असताना सुनीता यांना अनेक अडथळे, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र तरी त्या जिद्दीने पुढे जात राहिल्या, त्यांच्या या संघर्षात त्या २०१९ मध्ये उमेद (एमएसआरएलएम) अभियानाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. याठिकाणी त्यांच्या उद्योग उभारणीच्या प्रयत्नांना व्यावसायिक कौशल्य देणारे ब्रँडिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग याची उपयुक्त माहिती देणारे प्रशिक्षण मिळाले.
सरस प्रदर्शनातून उत्पादनाची सरस विक्री
ग्रामविकास विभागाच्या मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनात सुनीता यांना विक्रमी विक्रीचा अविस्मरणीय अनुभव प्रत्यक्ष घेता आला, या प्रदर्शनात अन्नपूर्णा फूड प्रॉडक्टसच्या उत्पादनांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यातून सुनीता यांनी आपल्या उत्पादनांची थोडी थोडकी नव्हे तर थेट १२ लाख रुपयांची विक्री केली, रेणापूर तालुक्यातील छोट्याशा गावातून सुरु केलेल्या व्यवसायाच्या उत्पादनांची इतकी मोठी विक्री होणे हे त्यांचे मोठे यश होते, कारण या विक्रीतून त्यांचा आत्मविश्वास वृद्धीगंत होऊन उद्योगाचे नवीन दालन त्यांच्यासमोर खुले झाले. व्यापक स्वरुपातील बाजारपेठेची ओळख आणि प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अनुभव त्यांना पुढील वाटचालीसाठी निश्चितच प्रेरणा देणारा आहे.
आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सुनीता यांना व्यवसाय वाढवण्यासाठी शासन योजनांच्या माध्यमातून उत्तम सहकार्य मिळत असून (पीएमएफएमई) योजना, शासकीय अनुदान, मशिनरी, पॅकेजिंग यूनिट यासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठीची प्रक्रिया त्यांनी सुरु केली आहे. आवळ्याचे उत्पादन आरोग्यदायी आहे, त्याला मोठी मागणी आहे, आणि भविष्यात ‘अन्नपूर्णा’ हा ब्रँड संपूर्ण भारतात पोहोचेल या विश्वासातून कार्यरत सुनीता यांचा हा प्रेरणादायी प्रवास इतरांच्या उमेदीला निश्चितच बळ देणारा आहे.
आपल्याला स्वावलंबनाची मिळालेली संधी अन्य महिलांच्या ही वाट्याला यावी, ही प्रामाणिक इच्छा असेलल्या सुनीता यांना स्वतःच्या यशाप्रमाणे इतर महिलांनीही यशाची चव चाखावी, असे प्रकर्षाने वाटत. म्हणूनच त्यांनी महिलांना विशेषतः विधवा, परित्यक्ता, गरजू महिलांना स्वअनुभवातून व्यवसायाचे मार्गदर्शन केले, त्यांच्या हाताला काम दिले. “एक बाई सक्षम झाली, की ती इतरांना मदतीचा हात देऊ शकते.” या व्यापक जाणीवेतून सुनीता यांच ‘अन्नपूर्णा’ हे केवळ फूड ब्रँड नाही, तर महिलांना स्वाभिमानाने उभे करणारे एक व्यासपीठ आहे. आर्थिक, शैक्षणिक भांडवलाचा अभाव असताना अडचणींतून मार्ग काढत स्वकष्टाने आणि जिद्दीने सुनीता यांनी इथपर्यंतचा गाठलेला टप्पा हा निश्चितच यशाच्या प्रवासातील मैलाचा दगड आहे.
०००
शब्दांकन – वंदना थोरात, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय





















WhatsApp