Home बातम्या ऐतिहासिक ‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन

‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन

0
‘उमेद’ अभियानातर्फे लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन

लातूर,दि.3(जिमाका):- ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी १ जून ते ३० जून या कालावधीत राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट आणि चित्रफीत निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा खुली असून व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते, यू ट्यूब ब्लॉगर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. राज्य स्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास एक लाख रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिकाचे स्वरूप पन्नास हजार रुपये व सन्मानचिन्ह असे राहील.
केंद्र सरकारच्या वतीने राज्यात २०११ पासून व जिल्ह्यात २०१८ इंटेनसिव्ह पद्धतीने दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (DAY-NRLM) राबविण्यात येत आहे.
महिला स्वयं सहाय्यता समूहाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून गरीब कुटुंबांच्या जीवनमानात बदल होत आहे. त्याच्या यशोगाथा दृकश्राव्य माध्यमातून चित्रीत करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रफीत जिल्हास्तरावर सादर करण्याची अंतिम मुदत १५ जून २०२२ आहे. जिल्हास्तरावर सहभागी स्पर्धकांपैकी उत्कृष्ट पाच स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून राज्यस्तरावर पाठविण्यात येईल. जिल्हास्तरावर चित्रफीत पाठविण्यासाठी “जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद लातूर” येथे संपर्क साधावा. चित्रफितीचा कालावधी सात मिनिटे असावा. चित्रफीत ही HD दर्जाची असावी. चित्रफीत ही अप्रकाशित असावी. लघुपट निर्मितीत व्यावसायिक, हौशी स्वयं सहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघ, ग्रामपंचायत, सामाजिक संस्थेसह नागरिक देखील सहभागी होऊ शकतात.
0000