Home ताज्या बातम्या उसाअभावी साखरेत 55 टक्क्यांची घट

उसाअभावी साखरेत 55 टक्क्यांची घट

0

रांजणी : राज्यात चालू वर्षी पुणे विभागात साखरेचे सर्वाधिक उत्पादन झाले आहे. पुणे विभागाच्या तुलनेत राज्यात इतर ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणात उत्पादन झाल्याने यंदा 20 जानेवारीपर्यंत सुमारे 55 टक्‍क्‍यांची घट आली आहे. 1 ऑक्‍टोबर ते 15 जानेवारी दरम्यान राज्यात 25.10 लाख टन साखरेचे उत्पादन झाले, असून उसाच्या उपलब्धतेअभावी यंदा साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यंदा राज्यातील बहुतांश साखर कारखाने उशिरा सुरु झाले. उसाच्या कमतरतेमुळे कमी साखर कारखान्यांनी उसाचे गाळप सुरु केले होते. साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या उत्तर प्रदेशात देखील यंदा कमी प्रमाणात साखरेचे उत्पादन निर्माण झाले आहे. कर्नाटक साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील 63 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 21.9 लाख टन साखर उत्पादन घेतले आहे.

राज्यात 2019-20 या सालात आजतगायत यंदा 25.51 लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.गेल्या वर्षी 57.25 टक्के साखरेचे उत्पादन झाले होते. पुणे विभागापाठोपाठ कोल्हापूर विभागातही चांगल्यापैकी साखर उत्पादन झाले असून पुणे आणि कोल्हापूर विभाग वगळता राज्यातील इतरत्र विभागात साखरेचे उत्पादन खूपच कमी आहे. दरम्यान साखर उत्पादनातील देशात नंबर दोनवर असलेल्या महाराष्ट्र राज्यात यंदा मुळातच उसाची उपलब्धता कमी असल्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात साखर उत्पादन घटले आहे.

2019 सालाच्या ऑगस्ट, सप्टेबर महिन्यात राज्यात महापूर आला. या महापूराने लागवड केलेल्या उसाचे पूर्ण क्षेत्र नष्ट झाले. हजारो हेक्‍टर क्षेत्रातील उस महापूरामुळे नष्ट झाला. त्याचा विपरित परिणाम उस उत्पादनावर झाल्याने शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाले आहे. राज्यातील साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निम्याहून अधिक घटले आहे. 1 ऑक्‍टोबर ते 20 जानेवारी दरम्यान चालू वर्षी राज्यात 25.5 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात या काळात सुमारे 139 साखर कारखान्यांनी गाळप केले. पुणे जिल्ह्यातील कारखान्यांचा विचार केला तरभीमा-पाटस, विघ्नहर, भिमाशंकर आणि घोडगंगा साखर कारखान्यांमध्ये चांगल्या प्रकारचे उस गाळप होऊन साखरेची निर्मिती झाली आहे.

…तर कारखान्यांवर कर्जाचा डोंगर-
नगर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एक साखर कारखाना उसाच्या उपलब्धतेअभावी बंद पडले आहेत. राज्यनिहाय साखर उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू वर्षीच्या साखर कारखानदारीचा विचार केला तर अनेक साखर कारखाने उसाच्या कमतरतेमुळे अडचणीत आले आहे. उसाअभावी गाळप करु न शकलेल्या साखर कारखान्यांवर आर्थिक कर्जाचा डोंगर उभा राहण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.