उसाच्या दरासाठी ‘रास्ता रोको’

- Advertisement -

पैठण:

उसाला ३१०० रुपये भाव जाहीर करा व काटा पेमेंट द्या, शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे उसाचे पैसे अदा न करणाऱ्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देऊ नका या व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैठण-शेवगाव रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासंबंधी व आंदोलनाविषयी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे १५ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यानुसार गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वात पैठण-शेवगाव रस्त्यावरील पाटेगाव येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. जवळपास एक तास सुरू असलेल्या या आंदोलनात आंदोलकांनी उसाची वाहतूक करणारी वाहने अडवून ठेवली.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आम्ही ऊस वाहतूक करणारी वाहने काही काळ अडवून शेतकऱ्यांचा ऊस वाळू नये म्हणून त्या सोडून दिल्या आहेत. यापुढे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणतेही वाहन सोडणार नाही. यामुळे, आंदोलन काळात शेतकऱ्यांनी ऊस तोडू व त्यांची वाहतूक करू नये, असे आवाहन माऊली मुळे यांनी केली आहे.

- Advertisement -