उस्मानाबाद जिल्ह्यात ५१ हजार ९७० शेतकऱ्यांची ३८४ कोटी ७९ लाखांची कर्जमुक्ती

- Advertisement -

उर्वरित शेतकऱ्यांनीही कर्जमुक्तीचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

        उस्मानाबाद । प्रतिनिधी : शासनाच्या २७ डिसेंबरच्या शासन निर्णयानुसार महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी चालू आहे. या योजनेअंतर्गत आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी एक्कावन हजार ९७० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ३८४ कोटी ७९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

२७ एप्रिल रोजी ५१९ गावातील पाच हजार ४७० पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी प्रसिध्द केली आहे. एकूण सहासष्ट हजार ७२७ लाभार्थी शेतकऱ्याच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. पैकी ४ एप्रिल पर्यंत चौपन हजार २८५ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले आहे. उर्वरित बारा हजार ४४२ शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे.

आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी एक्कावन हजार ९७० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ३८४ कोटी ७९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालू आहे. मात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण असणे अनिवार्य आहे.

दरम्यान, ज्या शेतकऱ्यानी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधावा आणि आपले आधार  प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आधार प्रमाणिकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास रक्कम अमान्य पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे व सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी केले आहे.

- Advertisement -