Home शहरे अकोला ऊर्जा बचत प्रकल्पासाठी महाप्रितचा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

ऊर्जा बचत प्रकल्पासाठी महाप्रितचा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

0
ऊर्जा बचत प्रकल्पासाठी महाप्रितचा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

मुंबई,दि. ७: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या  महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनीने आज दि. ७ एप्रिल रोजी पुणे महानगरपालिकेसोबत ऊर्जा व ऊर्जा खर्चाची बचत, धोरण, यासाठी उपाययोजना करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला.  या करारावर महाप्रितचे अध्यक्ष बिपिन श्रीमाळी व पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

स्वयंरोजगार  निर्मितीच्या संदर्भात दुर्बल घटकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ऊर्जा वापराच्या खर्चात बचत करण्याची योजना या प्रकल्पामध्ये आहे. पारंपरिक ऊर्जेला पर्याय म्हणून सौर उर्जा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्बन उत्सर्जन आणि डी-कार्बोनायझेशन कमी करणे, हे देखील या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. महाप्रित आणि पुणे महानगरपालिका यांचा संयुक्त उपक्रम हा महाराष्ट्र राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे, ज्याचा पुणे शहरासह समाजातील दुर्बल घटकांनाही उपयोग होणार आहे. पुणे महानगरपालिका (PMC) आणि महाप्रित  यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ओळखल्या जाणाऱ्या पात्र उद्योजकांना स्थानिक उद्योजकता सुरु करण्यास समर्थन देण्याचीही या प्रकल्पाची कल्पना आहे.  कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच ऊर्जा खर्चात बचत करण्यासाठी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही असे प्रकल्प हाती घेण्यास त्यामुळे चालना मिळेल.

यावेळी  महाप्रितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी म्हणाले की, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचत होईल. त्यामुळे भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चात बचत होईल.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. विक्रमकुमार यांनी या प्रकल्पाचा पुणे महानगरपालिकेला खूप फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करुन महाप्रित सोबत सामंजस्य करार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ.श्री. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कुंदल, अधिक्षक अभियंता (विद्युत)पुणे महानगरपालिका श्रीमती मनीषा शेकटकर, महाप्रितचे संचालक (संचलन) विजयकुमार काळम पाटील, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, महाप्रित, मुख्य महाव्यवस्थापक श्यामसुंदर सोनी, जनसंपर्क अधिकारी सतीश चवरे, गणेश चौधरी, विरेंद्र जाधवराव, पंकज शहा, प्रसाद दहापुते आणि मिलिंद अवताडे हे उपस्थित होते.

०००