
चंद्रपूर दि. 19 एप्रिल : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज (दि.19) वेकोलि चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी कोळसा खाण प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मायनिंग ऑपरेशन कसे होते, गुणवत्ता कशी राखली जाते, कोळसा खाण प्रबंधन कसे केले जाते, याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच पाईप कन्व्हेनरचे निरीक्षण सुद्धा जाणून घेतले. पाईप कन्व्हेनरच्या माध्यमातून रोज 6 हजार टन कोळसा पाईपद्वारे वाहतूक होते. त्यामुळे प्रदूषण थांबण्यास मदत होते, याबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी बोलताना राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, कोळसा खाण प्रकल्पात महिला कर्मचारी व अधिकारी सुद्धा कार्यरत आहे, हे जाणून आनंद झाला. सर्वांनी अतिशय चांगले काम करावे. महिला आज पुरुषांसोबत कोळसा खाण प्रकल्पामध्ये काम करीत आहे. चांगल्या कामामुळे आणखी वीज निर्मिती होईल. असेच काम भविष्यात सुद्धा सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी इरई धरणाची सुद्धा पाहणी केली.
यावेळी ऑपरेशनल डायरेक्टर संजय मारुडकर, मुख्य अभियंता विजय राठोड, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, यांच्यासह एरिया जनरल मॅनेजर हर्षद दातार, क्षेत्र प्रबंधक पुनम जेढढोबळे, खाण प्रबंधक मोहम्मद, डी.एन. तिवारी, सुनील ताजने, हरीश गव्हाळे आदी उपस्थित होते
महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार : ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर यांच्या हस्ते कोळसा खाण प्रकल्पात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यात विना गिरडकर, सारिका पोडे, प्रतिभा नांदे व इतर महिलांचा समावेश होता.