
मुंबई, दि. १७ : एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) दुसऱ्या फेरीचे सुधारित वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. उमेदवारांना १८ व १९ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविता येणार असून, एएनएमसाठी ही सुविधा केवळ महिला उमेदवारांना उपलब्ध आहे.
कॅप फेरी-२ ची निवड यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. निवड झालेल्या उमेदवारांनी २१ ते २४ नोव्हेंबरदरम्यान आवश्यक कागदपत्रे व शुल्कासह संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा.
त्यानंतर २५ ते २६ नोव्हेंबरदरम्यान संस्थास्तरीय प्रवेश फेरीसाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. पात्र उमेदवारांना २७ व २८ नोव्हेंबर रोजी संबंधित महाविद्यालयात अर्ज सादर करता येतील. पहिली निवड यादी २८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानुसार २९ व ३० नोव्हेंबर रोजी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
एएनएम व जीएनएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक, पात्रता व आवश्यक सूचनांसाठी www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने केले आहे.
०००००
अश्विनी पुजारी/विसंअ

WhatsApp