जळगांव :- प्रतिनिधी
– जळगाव जिल्हावासियांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडून त्यावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी ‘शासनाचे दूत’ म्हणून प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जळगावकरांना केले.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री. राऊत यांनी आज जळगावकरांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. जळगावकरांचाही मोठ्या प्रमाणात या लाईव्हप्रसंगी प्रतिसाद मिळाला. संवादाच्या सुरूवातीस श्री. राऊत यांनी जळगावातील कोविड योद्धे प्रयत्नांची पराकाष्टा करीत या युद्धात रात्रंदिवस काम करत आहेत. या यंत्रणांचे मनोबल उंचावणे आपणा सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. परंतु काम करताना होणाऱ्या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे कार्यही नागरिकांनी करावे, त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनासोबत येऊन प्रशासनास सहकार्य करावे, चुका असतील त्या कळवाव्यात, नागरिकांच्या सूचनांची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. राऊत म्हणाले.
‘मीच माझा रक्षक’ म्हणून काम करावे
लॉकडाऊन, कर्फ्यूने परिस्थिती नियंत्रणात येईलही, परंतु नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळत मास्कचा वापर करणे, वारंवार हात साबणाने धुणे, शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच स्वयंशिस्तीने सामाजिक जीवनात आपली जबाबदारी ओळखून समाजात जनजागृती तर करावीच, याचबरोबर ‘मीच माझा रक्षक’ माणून आपली स्वत:ची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावे, असे आवाहनही श्री. राऊत यांनी केले.
येता कणकण तापाची, तपासणी करा कोरोनाची
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परंतु प्रशासन पूर्ण क्षमतेने या रुग्णांच्या सोयी सुविधा, उपचार याबाबत पूर्णत: प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 66 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी समाधानाची व दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी कोरोना सदृश्य लक्षणे जाणवताच त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी. रॅपिड ॲटीजेन टेस्टमुळे दोन तासात तपासणी अहवाल मिळतो. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता आपली तपासणी करुन घ्यावी.
कोरोनाची लस आपल्याच हातात
या संवादातील कोरोनाची लस कधी येणार ? या प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, कोरोनाची सर्वात मोठी लस आपल्याच हातात आहे ती म्हणजे आपला मास्क होय. आता आपण मिशन बिगिनच्या तिसऱ्या टप्प्याकडे जात आहोत. या टप्प्यात अनेक बाबीं सुरु होणार आहे. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशावेळी प्रत्येक नागरीकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे. कोरोनाला हरविण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून नागरीकांनी बाहेर पडतांना मास्क वापरला पाहिजे. सोशल डिस्टिन्सिंगचे पालन केले पाहिजे.
मृत्यू दर कमी करण्यावर भर
जळगाव जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या अनुभवावरून जळगाव महापालिका, अमळनेर, भुसवाळ, चोपडा व रावेर या भागात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पूर्णत: कंबर कसलेली आहे. जिल्ह्याचा यापूर्वीचा मृत्यू दर हा 13 टक्के होता, आता हाच दर 4.66 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मृत्यू दर आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न सुरूच ठेवलेले आहेत. विशेषत: यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रिटमेंट या ‘ट्रीपल टी’ चा अवलंब करण्यात येत आहे. संक्रमित व संशयित लोक लवकर शोधून त्यांचेवर त्वरीत उपचार उपलब्ध करुन दिल्याने जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यात आपल्याला यश मिळाले आहे. नागरीकांना आपल्याला कोणताही त्रास होत असेल तर सांगितले पाहिजे. कुणीही आपल्या जुन्या आजारांची माहिती लपवू नये.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवा
जो व्यक्ती सुदृढ आहे तो कधीही आजारी पडत नाही. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे अहे. शासनाने तसेच आयुष मंत्रालयाने सांगितलेला आयुर्वेदिक काढा, अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या, योग्य आहार, व्यायाम, झोप यांचा अवलंब जीवनशैलीत करावा, असे सांगून श्री. राऊत म्हणाले की. आपण जिल्ह्यातील नागरीकांना 15 लाखापेक्षा अधिक अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप केले आहे.
लोकसहभागाचा जळगाव पॅटर्न देशभर नावाजला
कोरोनाच्या महामारीला हरविण्यासाठी अवघे जळगावकर एकवटले आहे. कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी आपले योगदान दिले आहे. त्यामुळेच अवघ्या एका महिन्यात जिल्ह्यात लोकसहभागातून 600 ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहे. जिल्ह्याच्या या लोकसहभागाच्या जळगाव पॅटर्नचे देशभरातून कौतूक होत आहे. याबद्दल जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींचे व मदत करणाऱ्यांचे धन्यवाद मानले.
स्वयंशिस्त पाळा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्याप काही बाबी सुरु करण्यास शासनाची परवानगी नसली तरी ऑनलाईन शिक्षणाला परवानगी दिलेली आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळून मोकळ्या जागेत व्यायाम करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, जे नागरीक शासनाच्या नियमांचे पालन करीत नाही, विनाकारण फिरत आहेत. त्यांचेवर पोलीस विभागाने कारवाया केल्या आहेत, गुन्हेही दाखल केले आहेत. पण अशी परिस्थिती उद्भवु नये म्हणून प्रत्येकाने स्वयंशिस्त लाऊन घेणे महत्वाचे असल्याचेही जिल्हाधिकारी कार्यक्रमाच्या समारोपात म्हणाले.