
– बालगाव आश्रमात शेतकऱ्यांसोबत केला दिवाळी फराळ
– शेतकऱ्यांच्या सुख दुःखात शासन पाठीशी असल्याचा दिला विश्वास
– शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन केले फराळ वाटप
सांगली, दि. ९ (जि. मा. का.) : पावसाने ओढ दिल्याने राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील ३०५ तालुके दुष्काळी घोषित केले. त्यात सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. अशा कठीण परिस्थितीत राज्य शासनाने शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. या अनुषंगाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा व विश्वास देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव योगश्रमात शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. दुष्काळी स्थितीच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकरी बांधवांशी दिवाळी फराळ करावा व या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी आमदार धैर्यशील कदम, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जतचे उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, बालगाव योगाश्रमाचे अमृतानंद स्वामीजी महाराज आदींसह परिसरातून आलेले शेतकरी उपस्थित होते.
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासन शेतकरी बांधवांसोबत असून, त्यांच्या सुख दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा विश्वास दिला. ते म्हणाले, अल निनोमुळे उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पीकपंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येईल. तोपर्यंत दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्य शासनाकडून रक्कम रुपये पाच हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यात येईल. याबरोबरच जतचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार व जिल्हाधिकारी यांनी दोन स्वतंत्र बैठका घ्याव्यात, असे त्यांनी यावेळी सूचित केले. त्याचवेळी पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करायचे आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा व त्याबाबत जनजागृतीही करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जतमधील दुष्काळी स्थितीबद्दल मंत्रीमहोदयांना अवगत करून आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी जतपर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचवण्यासाठी पंपाची क्षमता वाढविण्यास्व मंजुरी मिळाली आहे. तसेच नाबार्डच्या माध्यमातून उपनलिका उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. जत तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारण कामे हाती घेण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अल निनोचा प्रभाव पुढील वर्षीही असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असून, पुढील वर्षीच्या ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणी पुरवायचे आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे उपाय हाती घेण्यात आले आहेत. प्रशासनाने हाती घेतलेल्या रिचार्ज शाफ्टच्या एकूण कामांपैकी ९० टक्के कामे तसेच, जल जीवन मिशनचीही २५ टक्के कामे जत तालुक्यात आहेत. मागेल त्याला टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आवर्तनात जत तालुक्यातील तलाव प्राधान्याने भरुन घेण्यात येतील. याशिवाय शासकीय जमिनीवर चारा लागवडीसाठी बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. विकसित भारत जी राम जी च्या माध्यमातून जत तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे हाती घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट जमिनीवर बसून शेतकरी बांधवांसोबत फराळ केला. प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी बांधवास लाडू भरवून दिलासा दिला. उपस्थितापैकी एका शेतकऱ्यानेही पालकमंत्री महोदय यांना फराळ भरवून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सोबत आणलेला फराळ शेतकरी बांधवाना व मल्लखांब सादर केलेल्या मुलांना भेटवस्तू दिल्या. प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी दोन ग्रामस्थांच्या घरी जाऊन फराळ दिला. तसेच आस्थेने चौकशी करून संबंधितास धीर दिला. गावातील सर्व घरात बालगाव आश्रमाच्या मदतीने पालकमंत्री यांनी दिलेले फराळ किट वाटप करण्यात आले.
प्रारंभी विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

WhatsApp