Home बातम्या ऐतिहासिक एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा – उपमुख्यमंत्री

एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा – उपमुख्यमंत्री

0
एकरी १०० टन ऊस उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा – उपमुख्यमंत्री

बारामती दि. ७:   एकरी १०० टन ऊस  उत्पादनासाठी उपलब्ध तंत्रज्ञान शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

माळेगाव इंजिनिअरींग कॉलेजच्या “शरद सभागृहामध्ये”  आयोजित     शंभर टन ऊस उत्पादन अभियान  व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, मुख्य शास्त्रज्ञ ऊस संशोधन केंद्र पाडेगाव डॉ. भरत रासकर,  व कृषि महाविद्यालय पुणेचे समन्वयक डॉ. धरमेंद्रकुमार फाळके,  बारामती,दौंड, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील शेतकरी  उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या  एकरी १०० टन ऊस उत्पादन अभियान  हा एक  चांगला उपक्रम आहे.  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही ऊस उत्पादक शेतकरी एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेत आहेत. त्यांचा आदर्श घेवून येथील शेतकऱ्यांनीही उत्पादनात वाढ करावी.   सध्याच्या काळात शेतीत नवीन नवीन प्रयोग होत आहेत. कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून नवीन प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावे. शेती करतांना बियाणे निवड, खत मात्रा, सिंचनाचा वापर, ठिबक यंत्रणा व तज्ञांचा सल्ला आवश्यक असतो. शेतकऱ्यांना काळानुरूप नवीन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागणार आहे.

विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून ऊस पिकांची लागवड केली जाते. साखरेला दर चांगला आहे. परदेशात निर्यात केल्यास चांगला फायदा मिळेल.  सध्या साखरेचा खूप मोठा साठा शिल्लक आहे. साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे कल वळवावा. ऊसाएवजी शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे वळावे. सध्या कापसाला चांगला दर आहे. अशी पिकेही शेतकऱ्यांनी घ्यावीत, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांनी पाचट शेतामध्ये जाळू नये. पर्यावणाचे रक्षण करावे. कृषि विभागातील अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पाचटाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. भरत रासकर  व कृषि महाविद्यालय पुणेचे समन्वयक डॉ. धरमेंद्रकुमार फाळके यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत शेती औजारांसाठी बारामती उपविभागात एकूण ४ हजार १३० शेतकऱ्यांना अनुदान  मंजूर करण्यात आले आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना औजारेंचे वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर श्री. पवार यांनी माळेगावमधील शासकीय धान्य गोदमाला भेट देऊन तेथील पाहणी केली. तहसिलदार  विजय पाटील यांनी गोदमाविषयी माहिती दिली.

यावेळी बारामती तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदलसह इंदापूर आणि पुरंदर येथील कृषि अधिकारी अनुक्रमे भाऊ रुपणवार,   सुरज जाधव, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, श्री सोमेश्वर सहकारी  साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे आदी उपस्थित होते.

000