Home ताज्या बातम्या एका महिलेने करोनावर मात केल्याने सांगली जिल्हा सध्या करोनापासून मुक्त

एका महिलेने करोनावर मात केल्याने सांगली जिल्हा सध्या करोनापासून मुक्त

0

सांगली : इस्लामपूर येथील 25 आणि पेठवडगावमधील एका महिलेने करोनावर मात केल्याने सांगली जिल्हा सध्या तरी करोनापासून मुक्त झाला आहे. इस्लामपूरमधील एक करोनाबाधित महिला देखील करोनामुक्त झाली असून तिला शासकीय तंत्रनिकेतन येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान करोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 43 पैकी 31 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 12 जणांना अहवाल प्रलंबित आहे.

इस्लामपूर येथील चार जण 14 मार्च रोजी सौदी अरेबियातून भारतात परतले होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेले अन्य 22 जण अशा एकूण 26 जणांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मिरज करोना सेंटरमध्ये उपचार करण्यात येत होते. हे सर्व जण आता करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथे संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, इस्लामपूर येथील करोना बाधितांनी करोनावर मात करीत असतानाच सांगलीतील विजयनगर मधील एका बॅंक कर्मचाऱ्यास करोनाची लागणी झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर मिरजेत उपचार करण्यात येत होते. त्यामुळे सांगलीतील करोना बाधितांची संख्या 27 इतकी झाली होती. परंतु करोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. करोना बाधिताचा मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली होती. विजयनगर पूर्णपणे सील करून या भागात घरोघरी सर्व्हे करण्यात आला होता. करोना बाधित मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांसह 43 जणांचे क्वारंटाईन करण्यात होते. त्या सर्वांच्या स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. यामधील 31 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर अद्याप 12 जणाचा अहवाल प्रलंबित आहे.

तसेच 1 हजार 437 जणांचे संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधीत पूर्ण झाला आहे. सध्य स्थितीमध्ये 296 जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. तसेच वाराणसीहून मिरजेत आलेल्या 33 प्रवाशांचा अहवालसुद्ध निगेटिव्ह आला आहे. मरकजशी संबंधित एकूण 36 जणांची दुसरी तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 35 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर एकाचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच संस्था क्वारंटाईनमधील 289 व्यक्तींपैकी 116 जणांना सोडण्यात आले आहे. अद्याप मिरजेत 41, इस्लामपूर येथे 1 आणि मिरज शासकीय तंत्रनिकेत येथे 31 असे 73 जण अद्याप संस्था क्वारंटाईनमध्ये आहेत. इस्लामपूर येथील 26 जणांनी करोनावर मात केल्याने सांगली जिल्हा करोनामुक्त झाला आहे.