Home ताज्या बातम्या एक दिवस बळीराजासाठी

एक दिवस बळीराजासाठी

0
एक दिवस बळीराजासाठी

       आपल्या देशात सुमारे 60 ते 65 टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील लोकांची उपजिवीका शेती व्यवसायावर अवलंबून असते. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यातून येणारे नैराश्य व त्यातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतची कारणमिमांसा योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे.

              शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न प्रशासनाने समजून घ्यावेत, त्यावर कोणत्या उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घेता येतील यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करुन अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याविषयीच्या माहितीवर आधारित लेख.

 

प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांनी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामात येणाऱ्या अडचणी त्यांच्यासोबत विविध कामात सहभाग घेऊन सोडवण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सहभागी होणारे अधिकारी

या उपक्रमामध्ये राज्यस्तरावरील कृषिचे प्रधान सचिव, आयुक्त, कृषि संचालक तर विद्यापीठस्तरावरील शास्त्रज्ञ यामध्ये कृषि विद्यापीठांचे कुलगुरु, विद्यापीठांचे विभाग प्रमुख, कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता सहभाग घेतील.

विभागस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये विभागीय आयुक्त, विभागीय कृषि सहसंचालक तर जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) व इतर जिल्हास्तरीय अधिकारी सहभागी असतील. उपविभागीय स्तरावर महसूलचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी व इतर उपविभागीय स्तरीय अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांमध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व इतर तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

या उपक्रमामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी द्यायच्या आहेत.

गावांची व शेतकऱ्यांची निवड

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमात भेट देणाऱ्या गावाची निवड करताना दुर्गम, डोंगराळ, कोरडवाहू, आदिवासी, सामाजिक व दुर्बल असणारे क्षेत्राची निवड करण्यात येईल. गावाची निवड करताना संबंधित अधिकारी/पदाधिकारी यांनी त्यांच्या मुख्यालयापासून दूरची गावे निवडण्यात यावीत. गावाची निवड लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांना करुन द्यावी तसेच भेट देण्यात येणाऱ्या शेतकऱ्याची निवड करताना शक्यतो कोरडवाहू शेतकऱ्याची निवड करावी.

उपक्रम कालावधीत घ्यावयाची माहिती

अधिकारी, पदाधिकारी यांनी गावाची निवड केल्यानंतर गावातील शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था, गावातील बँका, सोसायटी, दूध संस्था शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत देतात याबाबत चर्चा करावी. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे येणारे उत्पादन, खर्च व बचत याबाबत त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा करुन माहिती घ्यावी. आत्महत्याग्रस्त विभागामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या नैराश्याची कारणे शोधावी. त्याअनुषंगाने त्यांच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेता येतील याचा सविस्तर अहवाल तयार करावा.

भेट देणाऱ्या गावामध्ये ग्राम कृषी विकास समितीची बैठक घेऊन त्यामध्ये गावाच्या पीक पद्धती, बदल करावयाच्या पीक पद्धतीबाबत तसेच शेतकरी वापरत असलेल्या तंत्रज्ञानाबाबत सविस्तर चर्चा होईल. तसेच ग्राम कृषी विकास आराखड्यावरही चर्चा घडवून आणली जाईल. शेतकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेबाबतच्या विविध योजनांची माहिती देण्यात येईल. विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे शेती करतानाचे अर्थकारण समजावून घ्यावे. नवनवीन तंत्रज्ञानाची पिकनिहाय वाणांची माहिती, गावामध्ये बैठका घेऊन देण्यात येईल.

गावातील शेतकरी, उत्पादक कंपन्या, बचत गट, महिला बचत गट, गटशेती उपक्रम इत्यादी माध्यमातून यशस्वी झालेल्या उपक्रमांना भेटी दिल्या जाणार आहेत. एकूणच ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल.

000000

                                                                   संकलन : विभागीय माहिती कार्यालय,पुणे