एक लाख कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टर रोचकरींचा मानस

- Advertisement -

उस्मानाबाद, प्रतिनिधी : बिन टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातून बरेच रुग्ण पर जिल्ह्यात जातात. तिथे त्यांच्या अमूल्य वेळेसह भरमसाठ रक्कमही खर्च होते. हे टाळण्यासाठी आम्ही आपल्या जिल्ह्यातच बिन टाक्यांची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करणार आहोत. त्या माध्यमातून एक लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा आपला मानस असल्याचे डॉ. प्रवीण रोचकरी यांनी सांगितले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्या नंतर त्यांचेवर ठिकठिकाणच्या लोकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. त्यांनी जिल्ह्यातील कांही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून आणि तुळजापूर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या काळात त्यांनी ग्रामीण जनतेशी आपले घनिष्ठ संबंध ठेवत जवळपास पस्तीस हजार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. आज पर्यंतच्या वैद्यकीय सेवेच्या काळात कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्याने इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया केल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या या सेवेमुळे जनमानसात ते प्रसिद्ध आहेत.

तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून अतिरिक्त कार्यभार ते सांभाळत आहेत. लेप्रोस्कोपी पद्धतीने बिन टाक्यांची शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आपल्या जिल्ह्यात सुरू व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील आहोत. त्यास वरिष्ठांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. लवकरच ही सुविधा चालू होईल. तेंव्हा आपण एक लाख शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम करू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -