Home शहरे जळगाव एरंडोल पोलीस ठाण्याचे प्रदीप चांदेलकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

एरंडोल पोलीस ठाण्याचे प्रदीप चांदेलकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर

जळगाव – येथील एरंडोल तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले असून यात जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस महासंचालकांकडून सन २०१९ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहेत.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच ३ पोलीस हवालदारांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड करण्यात आली आहे. आपल्या कार्यकाळात उत्तम सेवा बजावल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाकडून संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा बहुमान मिळाला आहे. यात जळगाव जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गोपाल महादू ठाकूर (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), राज्य गुप्तवार्ता विभागाचे जळगाव पोलीस निरीक्षक राजेश रमेश भागवत (विशेष शाखेत उत्तम कामगिरी), पोलीस निरीक्षक विनायक पांडुरंग लोकरे (नक्षलवाद्यांविरुद्ध पोलीस दलाने केलेल्या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी), सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), सहायक पोलीस उपनिरीक्षक भास्कर पांडुरंग कुलकर्णी (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), पोलीस हवालदार विठ्ठल पंडित देशमुख (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), पोलीस हवालदार अनिल राजाराम इंगळे (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी), पोलीस हवालदार सुनील भाऊराव चौधरी (पोलीस दलात १५ वर्षे सतत उत्तम कामगिरी) यांचा समावेश आहे.