एसटीच्या कंत्राटी भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखा; उमेदवारांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १३: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) लवकरच सुमारे 13 हजार 980 चालक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि निर्धारित नियमांनुसार पार पडावी. बाह्य संस्थेमार्फत होणारी उमेदवारांची निवड महामंडळाने निश्चित केलेल्या पात्रता निकषांनुसारच करण्यात यावी. तसेच, या प्रक्रियेत कोणत्याही उमेदवाराची फसवणूक होणार नाही, याची दक्षता एसटी प्रशासनाने घ्यावी, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

    एसटी महामंडळाच्या नावाचा गैरवापर करून काही खासगी संस्था गरजू व बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवत त्यांच्याकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. नोकरीच्या अपेक्षेने या संस्थांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत असून, अशा प्रकारांमुळे महामंडळाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचत आहे. काही व्यक्तींच्या गैरकृत्यांमुळे एसटी महामंडळाची जनमानसातील विश्वासार्हता बाधित होणे ही गंभीर बाब असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.

    या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रकारांची महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. उमेदवारांची फसवणूक करणाऱ्या खासगी संस्था तसेच त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची ओळख पटवून दोषींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

    भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची आर्थिक लूट करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्याबरोबरच उमेदवारांच्या हिताचे संरक्षण करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

    ००००

    संजय ओरके/विसंअ

     

     

    - Advertisement -