Home ताज्या बातम्या एसटीच्या मुख्यालयात हरित वीजनिर्मिती

एसटीच्या मुख्यालयात हरित वीजनिर्मिती

0
एसटीच्या मुख्यालयात हरित वीजनिर्मिती

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी हरित ऊर्जानिर्मितीचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या राज्य परिवहनने यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. मुंबई-पुण्यातील इमारतीच्या छतावरील सौरऊर्जा संयंत्रातून रोज दीडशेहून अधिक युनिटची वीजनिर्मिती होत असून हरित ऊर्जेची निर्मिती करणारे एसटी महामंडळ हे बहुदा देशातील पहिलेच प्रवासी महामंडळ आहे.

महामंडळाची आर्थिक स्थिती प्रचंड खालावली असल्याने खर्चात बचत करून उत्पन्न वाढवण्यावर मुख्यालयातील अधिकाऱ्यांचा भर आहे. दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी आणि दुसरीकडे वीजेचे वाढते दर लक्षात घेता एसटी महामंडळाने हरित विजेचा पर्याय स्वीकारला आहे.

मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालय अर्थात, ‘महाराष्ट्र वाहतूक भवनावर’ आणि पुण्यातील विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर सौर ऊर्जा संयंत्रणाद्वारे हरित वीज निर्मिती सुरू झाली आहे. मुख्यालय, बस आगार अशी विस्तृत इमारत असल्याने येथे १४ लाख ९६ हजार रुपये खर्च करून सौर संयंत्र बसविण्यात आली. या संयंत्रातून रोज १५० युनिट वीजनिर्मिती होते. यातून इमारतीची दैनंदिन वीज क्षमता काही अंशी पूर्ण होते. सुमारे ७ लाख ६४ हजार रुपये गुंतवून पुण्यातील विभागीय कार्यालयाच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला. येथून रोज १० ते २० युनिट विजेची निर्मिती होते, असे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जमा होणारी वीज मुंबईत बेस्टला तर पुणे विभागात वीज मंडळाला विकण्यात येते. या मोबादल्यात एसटीला वीज देयकांमध्ये घसघशीत सूट मिळते. यामुळे वाहतूक भवनातील वीज बिलात सुमारे ५० ते ६० हजार आणि पुण्यातील वीज बिलात सुमारे १० हजारांपर्यंत बचत होते.

भविष्यात एसटी महामंडळाच्या सर्व आगारांवर सौर ऊर्जेची निर्मिती करण्याचे महामंडळाचे धोरण आहे. मुंबई-पुण्यात प्रयोग यशस्वी झाल्याने आता लवकरच संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जा संयंत्र बसविण्यात येणार आहेत.

१२ लाखांहून अधिक प्रवासी वाहतूक

करोना निर्बंधात मोकळीक मिळाल्यानंतर राज्यात एसटी वाहतुकीने वेग घेतला आहे. ६ जूनपर्यंत रोज २ लाख प्रवासी प्रवास करत होते. १६ जून रोजी हा आकडा १२ लाख ३६ हजार प्रवाशांवर पोहोचला आहे. एसटीचे रोजचे उत्पन्नदेखील सुमारे सात कोटीपर्यंत पोहोचले आहे.

Source link