Home बातम्या महत्वाच्या बातम्या एसटी ताफ्यात येणार इलेक्ट्रिक बस

एसटी ताफ्यात येणार इलेक्ट्रिक बस

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना आता लवकरच वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. महामंडळाने भाडेतत्वावरील १५० ई-बस घेण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुंबई, पुणे, नाशिक या शहरांना जोडणाऱ्या  मार्गांवर बस सुरू करण्याचा महामंडळाचा विचार असल्याचे समजते.
एसटीच्या ताफ्यातील १८ हजारांहून अधिक बस राज्यभरात विविध मार्गांवर धावतात. या सर्व बस डिझेलवरील आहेत. मागील दीड-दोन वर्षामध्ये डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने एसटीला आर्थिक भार सहन करावा लागला आहे. ही दरवाढ सध्या स्थिर असली तरी डिझेलचा खर्च वाढत चालल्याने एसटीकडून इतर पर्यायांचा विचार सुरू करण्यात आला आहे. राज्यात बॅटरीवर चालणाऱ्या ईलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. पुण्यामध्ये शहर बस वाहतुकीसाठी काही महिन्यांपुर्वी २५ ई-बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या. आणखी १५० बस लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत. इतर शहरांमध्येही ई-बसची मागणी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून ई-बसला पसंती दिली जात आहे. यापार्श्वभुमीवर एसटीकडूनही ई-बस घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये १५० वातानुकूलित ई-बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार आहेत. एका बसची किंमत सुमारे २ कोटी रुपये एवढी आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्षअखेरीस या बस मार्गावर येण्याची शक्यता आहे. पण बसचे मार्ग अद्याप निश्चित झालेले नाहीत. असे असले तरी पुणे-मुंबई, मुंबई-नाशिक अशा मार्गांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. लांब पल्ल्याच्या मार्गावर ई-बस सुरू करण्यासाठी त्या मार्गावर तसेच बसचे सुरूवातीचे व अंतिम स्थानकावर चार्जिंग सेंटर उभारावी लागणार आहेत. याबाबतही चाचपणी करण्यात आल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. 
———–
इलेक्ट्रिक बसबाबत शासनाचेही सकारात्मक धोरण आहे. भविष्यात याचाच वापर जास्त होणार आहे. म्हणून एसटी महामंडळानेही ईलेक्ट्रिकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या १५० बस घेण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कोणत्या मार्गावर सोडायच्या याबाबतचा निर्णय घेण्यात घेण्यात आलेला नाही. तसेच बस कधीपर्यंत मिळतील, हे अद्याप निश्चित नाही. 
– रणजितसिंह देओल
व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

ई-बसचे फायदे –
– इंधन खर्च कमी होणार
– वातानुकूलित बसमुळे प्रवाशांचा सुसह्य प्रवास
– प्रदुषणविरहित
– देखभाल-दुरूस्तीचा खर्च कमी