डोंबिवली : जादा व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत ५४ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुमारे २ कोटी ९३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली आहे. तपासकामी एक पोलीस पथकही गठित करण्यात आले आहे.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात गुडविन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गुंतवणूक केल्यास १६ टक्के व्याजदर मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक केली होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावर ज्वेलर्सचे दुकान बंद राहील्याने चर्चेला तोंड फुटले. आणि, समाज माध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक आपले सामान घेऊन पसार झाल्याचा संदेश फिरण्यास सुरुवात झाली. दोन दिवस वाट पाहूनही दुकान उघडण्यात आले नसल्याने अखेर गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सदरचा तक्रार अर्ज दाखल होताच पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे दुकान सील करीत सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोघा दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.